Thane Women Prayers To God For Eknath Shinde To Become CM : ठाण्यात महिलांनी महाआरत्या करत एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाला साकडे घातले आहे.
एकनाथ शिंदेंसाठी गणरायाकडे साकडे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी ठाणे पूर्वेच्या दौलतनगर व कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी महाआरती करण्यात आली. कशिश पार्क येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले – जाधव यांच्यासह नागरिकांनी गणरायाला आरती करून शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे, असे भावनिक साकडे घातले.
त्यानंतर विकास रेपाळे यांनी ठाण्याच्या हाजुरी येथील दर्ग्यात मुस्लिम बांधवांसह शिंदे यांच्यासाठी प्रार्थना केली. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणरायाची आरती केली आणि साकडं घातले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीमुळे आजारातून बरे झालेल्या शेकडो रुग्णांनी श्री सिद्धीविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना केली. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत, अशी गणेशा चरणी मनोकामना केली.
कॅप्टन एकनाथ शिंदेच
विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते. त्यांच्याच कॅप्टनशीप खाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमताने जिंकली. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे तीन तास देखील झोपले नाहीत. महाराष्ट्र सुखी-समृद्ध व्हावा, यासाठी ते दिवसरात्र काम करत होते.
राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे, यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरुन यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून शिंदे यांना जाते. त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे, असे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सांगितले.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, पंढरपुरात हवन
नाशिक येथील शिव मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत, यासाठी पुजाअर्चा करण्यात आली. पंढरपूर येथे साधू – संतानी विठ्ठल मंदिरात हवन करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना करण्यात आली आहे.