Raigad News: रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत असणाऱ्या पुलावर मारुती सुझुकी सेलेरिओ कारचा अपघात झाला आहे. या अपघातात तरुण दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे.
दशरथ दुदुमकर आणि देवयानी दशरथ दुदुमकर असे मृत दाम्पत्याचे नाव असून ते मुंबई अँटॉप हिल येथील रहिवासी आहेत. गावाहून मुंबईतील स्वगृही परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये चालकाचा प्राण वाचले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वावे दिवाळी गावाच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता महाडमधून मुंबई दिशेने जात येत असलेल्या मारुती सुझुकी सेलेरिओ कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून कार थेट नदीत कोसळली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
कारमध्ये पती पत्नी आणि चालक असे एकूण तीन प्रवासी होते. त्यातील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. यामध्ये तरुण दाम्पत्य जागीच ठार झाल्याने त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडला आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने मारुती कारला बाहेर काढण्यात आले आहे. जखमी कारचालकाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तर सदर प्रकरणी माणगाव पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.