Eknath Shinde: महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत जवळपास ८० टक्के जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला अवघ्या ५० जागांवर रोखत महायुतीनं बंपर यश मिळवलं. त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे.
२०१४ मध्ये भाजपनं १२२ जागा स्वबळावर जिंकल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्यांना कमी महत्त्वाच्या खात्यांसह सत्तेत जावं लागलं. शरद पवारांच्या खेळीमुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची गरज भासली नाही. उलट शिवसेनेलाच सत्तेत जायचं असल्यानं त्यांना भाजप देत असलेली खाती पदरात पाडून घ्यावी लागली.
आता भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. बहुमतापासून पक्ष अगदी जवळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या शिंदेंकडे फारसे पर्याय नाहीत. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत शिंदेंच्या शिवसेनेचं मूल्य कमी केलं आहे. २०१४ मध्ये काकांनी केलेल्या खेळी आता अजित पवारांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री अशी रचना कायम ठेवण्याची भाजपची तयारी आहे. त्यांच्याकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आलेली आहे. महत्त्वाचे विभाग शिंदेंना देण्यास भाजप तयार आहे. शहरविकास, एमएसआरडीसी, उद्योग, कृषी, जलसंधारण असी खाती शिवसेनेला मिळू शकतात. यातील शहरविकास मंत्रालय शिंदेंनी ठाकरे सरकारमध्ये असताना सांभाळलं. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते आपल्याकडे ठेवलं.
देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पक्षादेश मानून उपमुख्यमंत्रिपद घेतलं. पक्षाची गरज लक्षात घेत त्यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वात काम केलं. शिंदे २०१४ ते २०१९ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. पण त्यानंतर शिंदे फडणवीसांना सिनीअर झाले. आता तशीच वेळ पुन्हा शिंदेवर येण्याची दाट शक्यता आहे.