विदर्भात २३ आमदार मंत्रिपदाच्या स्पर्धेत; भाजपकडून १६, शिवसेनेतून तीन तर राष्ट्रवादीकडून चौघे दावेदार

Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडून सर्वाधिक १८, शिवसेनेतून दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघांकडून दावेदारी केली जात आहे. यातील नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स
political chair

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला दिल्लीत होणार असला तरी मंत्रिपदासाठी स्पर्धा वाढू लागली आहे. एकट्या विदर्भातून २४ आमदार मंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. भाजपकडून सर्वाधिक १८, शिवसेनेतून दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघांकडून दावेदारी केली जात आहे. यातील नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

फुके, भोंडेकर शर्यतीत
भंडारा विधानसभा निवडणुकीत लाखाच्या वर मते घेऊन विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. हे प्रत्यक्षात आल्यास भंडाऱ्याला गृहजिल्ह्यातील पालकमंत्रीपद मिळू शकणार आहे. २००९मध्ये पहिल्यांदा नरेंद्र भोंडेकर विधानसभेत पोहोचले होते. यानंतर २०१९ आणि आता २०२४मध्ये सलग दुसऱ्यांदा ते आमदार झाले आहेत. निवडणुकीच्या कालावधीत भोंडेकर यांच्या प्रचारार्थ पवनी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना निवडून दिल्यास त्यांना पालकमंत्रीपद देऊ, अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा बळावली आहे. आ. भोंडेकर यांच्या पाठोपाठ विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनाही मंत्रिपद देण्याची मागणी स्थानिक भाजप कार्यकर्ते करीत आहेत. डॉ. फुके हे २०१९मध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आताच्या विधानसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात फुके यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांनाही मंत्रिपद द्यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची आहे.
पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा
मंत्रिपदाची ‘चाबी’ पटेलांच्या हाती
– राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस
– विनोद अग्रवाल, भाजप

गोंदिया जिल्ह्यात तिरोडा, आमगाव, गोंदिया आणि अर्जुनी-मोरगाव अशा चार विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार निवडून आले. काँग्रेसमुक्त गोंदियामागे खासदार प्रफुल्ल पटेल यांची रणनीती होती. परिणामी निवडून आलेल्या आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय खासदार पटेल यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पहिल्यांदा गोंदिया मतदारसंघात कमळ फुलवित इतिहास घडविला. सलग तिसऱ्यांदा निवडून येत तिरोड्यातील भाजपचे आमदार विजय रंहागडाले यांनी हॅट्‌ट्रिक केली. आमगावचे संजय पुराम यांची दुसरी टर्म आहे. तर अर्जुनी-मोरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले हे २०१४मध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राहिले आहेत. खा. पटेल यांनी आपल्या प्रचारसभेत बडोले यांना आमदार बनविण्यासाठी नव्हे तर मंत्री बनविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले होते. गोंदियाला कॅबनिट मंत्री मिळावा म्हणून पटेल प्रयत्न करीत असल्याचीही माहिती आहे. तरीही अग्रवाल रहांगडाल की, बडोले अशी स्पर्धा रंगणार आहे.

मुनगंटीवार, भांगडियांची चर्चा
– सुधीर मुनगंटीवार, भाजप
– बंटी भांगडिया, भाजप

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार आणि चिमूरमधून तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले बंटी भांगडिया या दोन नावांची मंत्रीपदासाठी चर्चा होऊ लागली आहे. मुनगंटीवार जवळपास निश्चित असले तरी एकाच जिल्ह्यात दोन मंत्री या सूत्रात भांगडिया यांची अडचण होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तत्कालीन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून १९९५मध्ये ५५ हजारांहून अधिक मताधिक्य घेत मुनगंटीवार निवडून आले होते. यानंतर १९९९, २००४पर्यंत सलग चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून गेले. विजयाची हॅट्‌ट्रिक त्यांनी केली. नंतर त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली. या मतदारसंघातूनही त्यांनी हॅट्‌ट्रिक साधली आहे. या निवडणुकीत सातव्यांदा ते विधानसभेत पोहचले आहेत. त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. वन मंत्रालयासोबत आणखी कुठले खाते त्यांच्या पदरी पडते याकडे लक्ष लागून आहे. चिमूरचे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. भांगडिया यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील पाचपैकी मुनगंटीवार, भांगडिया आणि किशोर जोरगेवार हे यापूर्वीही आमदार होते. तर राजुऱ्याचे देवराव भोंगळे आणि वरोऱ्यातील करण देवतळे हे दोघे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.
महिला आमदारसंख्या घटली; ​’लाडक्या बहिणीं’ना उमेदवारी देण्यात हात आखडता, विधानसभेत किती जणींना संधी?
अकोल्यातून सावरकर!
– रणधीर सावरकर, भाजप

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर हॅट्‌ट्रिक करत तिसऱ्यांदा निवडून आले. पन्नास हजारांहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळविला. त्यांचा पक्षाकडून मंत्रिपदासाठी विचार होत असल्याची माहिती आहे. रविवारी रात्रीच त्यांना मुंबईलाही बोलावून घेण्यात आले आहे. सावरकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गावागावांत भाजपचे संघटन मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची दखल मंत्रीपदाच्या रुपाने घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कुटे, संचेती स्पर्धेत
– संजय कुटे, भाजप
– चैनसुख संचेती, भाजप

जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा ‘कमळ’ फुलवित भाजपचा गड कायम राखणारे डॉ. संजय कुटे हे महायुती सरकारमधील मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तर पाच टर्म आमदार राहिलेले भाजपचे चैनसुख संचेती यांनादेखील मंत्रिपद देण्याचा दावा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. ओबीसी चेहरा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून डॉ. कुटे परिचित आहेत. २०१४मध्ये ओबीसी कल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २००४ मध्ये जलंब मतदारसंघातून डॉ. कुटे यांनी कॉंग्रेसचे कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला होता. २००९ला जळगाव-जामोद मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघातूनही डॉ. कुटे यांनी बाजी मारली. २०१४, २०१९ आणि आता २०२४च्या निवडणुकीतही कुटे आमदार झाले आहेत. परिणामी त्यांचा मंत्रिपदासाठी प्रामुख्याने विचार होणार असल्याचे सांगितले जात आहे. चैनसुख संचेती यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सलग पाचवेळा आपला गड कायम राखला. २०१९ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०२४च्या निवडणुकीत संचेती आमदार झाले. त्यांच्या आमदारकीची ही सहावी टर्म आहे. १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ असा त्यांचा आमदारकीचा काळ राहिला. तेदेखील मंत्रिपदाची दावेदारी करत आहेत.
कॉंग्रेसची जादू ओसरली, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातून कॉंग्रेस गायब; तिन्ही उमेदवार पराभूत
यवतमाळात तिहेरी स्पर्धा
– संजय राठोड, शिवसेना
– डॉ. अशोक उईके, भाजप
– इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस

यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे संजय राठोड हे विद्यमान मंत्री असल्याने त्यांना नव्या सरकारमध्येही स्थान मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. यासोबतच भाजपचे डॉ. अशोक उईके, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांच्यात मंत्रीपदासाठी स्पर्धा राहणार आहे. दोन वेगळे पक्ष असले तरी एकाच जिल्ह्यात तीन मंत्री होणार असल्याने कुणाच्या नावावर फुली पडणार याकडे लक्ष लागून आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मदन येरावार यांचा पराभव झाल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीमधून त्यांचे नाव मागे पडले आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून राठोड पाचव्यांदा निवडून आले आहेत. राठोड यांच्यासोबत भाजपचे डॉ. उईके यांचेही नाव स्पर्धेत आहे. उईके यांनी राळेगाव मतदारसंघातून प्रा. पुरके यांचा पराभव केला आहे. ९८ हजार मतांनी विजयी झालेले पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांचाही मंत्रीपदासाठी विचार केला जात आहे.

आत्रामांना पुन्हा संधी?
– धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम निवडून आले आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. नव्या मंत्रिमंडळात आत्राम यांना परत संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तीन टर्म राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर धर्मरावबाबा यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती. तब्बल पाचव्यांदा धर्मरावबाबा विधानसभेवर निवडले गेले आहेत. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात मुलगी भाग्यश्री आत्राम आणि पुतणे अंबरीश आत्राम निवडणूक रिंगणात असल्याने चुरस वाढली होती. यातही धर्मरावबाबा यांनी विजय मिळवून आपली पकड सिद्ध केली.
गुप्तधनातून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात घडलं भयंकर; आले ५ अन् परतले ३; बागलाणच्या जंगलात नेमकं काय घडलं?
कुणावारांची मोर्चेबांधणी
-समीर कुणावार, भाजप

वर्धा जिल्ह्यात भाजपचे चारही आमदार निवडून आले. हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांनी हॅट्‌ट्रिक केली. नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी त्यांच्याकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यांनी मुंबईत तळ ठोकला असून नगरविकास खाते मिळणार असल्याचीही चर्चा वाढली आहे. कुणावार यांचे भापमधील गडकरी, फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्याशी निकटचे संबंध आहेत. विधिमंडळात वेळोवेळी त्यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. विधानसभेत प्रश्न विचारण्यातदेखील अग्रेसर राहिले आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान बरेच वरिष्ठ नेते कुणावार यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संकेत देऊन गेले होते.

राणा, अडसड, खोडके शर्यतीत
– रवी राणा, अपक्ष
– सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस
– प्रताप अडसड, भाजप

अमरावती जिल्ह्यातून महायुती समर्थित बडनेऱ्याचे आमदार रवी राणा, भाजपचे धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. आ. राणा हे चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी अचलपूर, धारणी, तिवसा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. याची दखल म्हणून महायुतीत त्यांच्या मंत्रीपदाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची ही दुसरी टर्म आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड हे सलग दुसऱ्यांदा भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे ते पुत्र आहेत. या तिघांमध्ये कुणाला मंत्रीमंडळात स्थान मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

CM Eknath ShindeDevendra Fadnavismaharashtra state cabinet expansionmahayuti governmentstate cabinet ministervinod agrawalनागपूर बातम्यानागपूर राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment