Nashik Air Pollution : शहरातील खड्डेमय रस्ते आणि त्यामुळे हवेत वाढलेले धुळीचे प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण वायु गुणवत्ता निर्देशांक वाढीस कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे नाशिकच्या हवा शुद्धतेसाठी पालिकेला नव्याने आराखडा आखावा लागणार आहे.
वाढते शहरीकरण, औद्योगीकरणामुळे दिवसागणिक रस्त्यांवर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र बनले आहे. या नागरिकांच्या दुष्टचक्रामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्णय घेत केंद्राने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ठेकेदारांचंच चांगभलं…
हवेतील प्रदूषणाची पातळी कमी करून शुद्ध हवानिर्मिती करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक मदत देऊ केली असून, पालिकेलाही ८७ कोटींचा निधी दिला आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत ४५ कोटींचा निधी खर्चही केला आहे. परंतु, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेच्या गुणवत्तेच्या दैनंदिन मोजणीत या निधीतून शहराची हवा शुद्ध होण्याऐवजी ठेकेदारांचंच चांगभलं झाल्याचे समोर आले आहे.
प्रमुख शहरांतील एक्यूआय
शुद्ध हवेसाठी शहराचा एक्यूआय ५० च्या आत असावा लागतो. मात्र, नाशिकचा एक्यूआय ११३ वर पोहोचला असून, तो वाईट मानला जातो. मुंबई- १२१ एक्यूआय, – कोलकाता १२६, हैदराबाद १०३, चेन्नई- ११२, अहमदाबाद- १०९, – बेंगळुरू ९१ असा देशातील प्रमुख शहरांचा एक्यूआय असून, नाशिकची – हवा मुंबईच्या खालोखाल घसरल्याचे समोर आले आहे.
आरोग्यावर विपरित परिणाम
नाशिकमध्ये केटीएचएम कॉलेज येथे जुलै २००५ पासून हवेची गुणवत्ता मापन यंत्र कार्यरत असून, खासगी संस्थांचीदेखील गुणवत्ता मापक यंत्रे आहेत. त्यातून हाती आलेली आकडेवारी ‘स्वच्छ सुंदर हरित नाशिक’च्या ब्रीदवाक्यास हरताळ फासणारी ठरली आहे. हवेची गुणवत्ता घसरल्याने दम्याचा आजार असलेल्या रुग्णांसह संवेदनशील लोकांच्या आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात. हे टाळायचे असल्यास घराबाहेरील कामे मर्यादित ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
हवा शुद्धता मापक ‘एक्यूआय’ स्थिती
■० ते ५० चांगला
■ ५१ ते १०० मध्यम
■ १०१ ते २०० वाईट
■ २०१ ते ३०० आरोग्यास अपायकारक
■३०१ ते ४०० अत्यंत धोकादायक
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहराच्या हवा शुद्धतेसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. – अजित निकत, उपायुक्त (पर्यावरण), महापालिका