Bhavana Gawali Banners in Wahim : भावना गवळी यांच्यासाठी मतदारसंघात समर्थकांनी बॅनरबाजी करत त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. आपल्या नेत्याचा हा पराभव नसून विश्वासघात असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
“रिसोड – मालेगाव मतदारसंघाचा पराभव हा पराभव नसून विश्वासघात आहे. अपराजित माजी खासदार भावना गवळी यांना मंत्रिपद द्या तरच वाशिम जिल्ह्याचा विकास होईल.” असा आशय लिहिलेले बॅनर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भावना गवळी यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे भावना गवळी मंत्री होतील का? अशी चर्चा वाशिम जिल्ह्यात होत आहे.
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला चांगल यश मिळालं आहे. २३० जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आता मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा अद्यापपर्यंत सुटला नसताना, भावना गवळी यांच्या समर्थकांनी मालेगाव शहरात झळकावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भावना गवळी या सलग पाच वेळा खासदार राहिल्या आहेत. तर विधान परिषद सदस्य सुद्धा आहेत. नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणुक देखील त्यांनी लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. महायुतीत ही जागा शिंदे सेनेला सुटली होती, मात्र भाजपचे नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख आणि महायुतीच्या भावना गवळी या दोघांचाही पराभव करत काँग्रेसचे अमित झनक चौथ्या वेळी निवडून आले. अनंतराव देशमुख यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता त्यामुळेच भावना गवळी यांचा पराभव झाला, अशी चर्चा रिसोड मतदार संघात दबक्या आवाजात होत आहे. त्यामुळे “रिसोड मतदार संघाचा पराभव हा पराभव नसून विश्वासघात आहे” असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला असावा अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.
पराभव नसून हा विश्वासघात आहे! माजी खासदारांना मंत्रीपदासाठी दबाव तंत्राचा वापर; पाहा काय केले
भावना गवळी या शिवसेनेच्या नेत्या असून पक्षात ज्येष्ठ आहेत. विदर्भातील शिवसेनेचा मुख्य चेहरा हा भावना गवळी आहेत. त्यामुळे “लाखात एक विदर्भाची लेक” असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. भावना गवळी या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिण आहेत. भावना गवळी यांना मंत्री केल्यास विदर्भात शिंदे सेनेची ताकद वाढेल अशी असा आशावाद गवळी समर्थकांना आहे. तर वाशिम जिल्ह्याचा विकास सुद्धा त्या करतील अशीही आशा त्यांना आहे. मात्र एकनाथ शिंदे भावना गवळी यांना मंत्री करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.