Ashish Deshmukh Advice to Defeated Congress Leaders: पूर्ण देशात काँग्रेसचे पतन होत असल्याने समोर कोणतेही भविष्य नाही. सर्व १६ नूतन सदस्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे, असा खोचक सल्ला आ. आशिष देशमुखांनी दिला.
राज्याच्या स्थापनेपासून पक्षाच्या कामगिरीची तुलनेक आकडेवारी सादर करून डॉ. देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळले. लोकसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असले तरी काँग्रेसचे संख्याबळ सर्वात कमी आहे. दहा टक्केहून कमी सदस्य संख्या असणारी महाराष्ट्राची विधानसभा देशातील सतरावी आहे. २८ राज्यांपैकी १७ राज्य तसेच दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुद्दुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसची स्थिती अशीच आहे. किमान दहा लोकसभा मतदारसंघ असलेल्या १८ राज्यांपैकी काँग्रेसकडे आता सात राज्यांमध्ये दहा टक्केपेक्षा कमी आमदार आहेत. देशातील आमदारांचा सातत्याने घटणारा टक्का ही त्यांच्यासाठी आणखी चिंतेची बाब आहे, असा टोलाही आशिष देशमुख यांनी लगावला.
देशातील एकूण आमदारांमध्ये काँग्रेसचा वाटा १९.५ टक्के आहे. महाराष्ट्रातील २८८ सदस्यांच्या विधानसभेत अवघ्या १६ आमदारांमुळे काँग्रेसचा टक्का ५.५५ आहे. १९६२ सालानंतर विधानसभेत पक्षाचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी जागा आहेत. सद्यस्थितीत काँग्रेसकडे दहा टक्केहून कमी सदस्य असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर दावा न करण्याची नामुष्की ओढवली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसचे १९६२ ते १९७२ पर्यंत बहुमत होते. आणिबाणीनंतर १९७८ साली पराभव झाला पण, १९८० व १९८५ साली जोरदार मुसंडी मारली. मात्र, १९९० साली भाजप-शिवसेनेची युती होताच काँग्रेसच्या संख्याबळात घट सुरू झाली. १९९५ साली युतीचे सरकार बनले. १९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली तरी, दोन्ही काँग्रेसने आघाडी करून तीन वेळा सत्ता स्थापन केली. मात्र, १९९५ नंतर काँग्रेसला ३० टक्केहून अधिक जागा मिळाल्या नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये २० टक्के आणि आता दहा टक्केहून कमी जागा आल्या. यावेळच्या ऐतिहासिक निकालाने काँग्रेसच्या निचांकाचा विक्रम झाला, असा दावाही आशिष देशमुख यांनी केला.
विदर्भ व मराठवाड्यात अनुक्रमे ६२ आणि ४६ जागा आहे. राज्यातील सर्वाधिक ग्रामीण भाग व जीडीपीनुसार सर्वात गरीब प्रांत आहे. या दोन्ही भागातून १६ पैकी दहा आमदार अर्थात १०८ जागानुसार दहा टक्केहून कमी निवडून आले. उर्वरित सहा अन्य भागातून आले आहेत. प्रत्येक राज्यात कमी होत असलेल्या जागांमुळे काँग्रेस आमदारांकडे आता कुठलाही पर्याय उरलेला नाही. समोर कोणतेही भविष्य नाही. त्यामुळे नूतन १६ भाजपमध्ये विलीन व्हावे, असेही डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.