Eknath Shinde: शिवसेना आणि भाजप युतीत पाच वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. मुख्यमंत्रिपदामुळे दोन पक्षांची युती तुटली. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तशाच घडामोडी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाववरुन सुंदोपसुंदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्रिपद कायम राखण्यासाठी शिवसेनेकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीला विधानसभेत दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे विजयानंतर लगेच त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आल्यास चुकीचा संदेश मतदारांमध्ये जाईल, असा युक्तिवाद शिवसेनेकडून करण्यात येत आहे. पण तब्बल १३२ जागा जिंकणारी भाजप आता मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. सातत्यानं आपणच त्याग का करायचा, असा सवाल कार्यकर्त्यांकडून नेत्यांना विचारला जात असल्यानं नेतृत्त्वावर दबाव वाढलेला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवणार आहे.
भाजपचा मुख्यमंत्रिपद झाल्यास, फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेल्यास त्याला आमचा आक्षेप किंवा विरोध असण्याचं काहीच कारण नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कालच मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कल मुख्यमंत्री भाजपचा असावा या बाजूनं आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं त्यांना आपल्या बाजूनं खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी काल शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क करण्यात आला. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी काल मुंबईत तासभर यासंदर्भात चर्चादेखील केली.
राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीला करण्यात आली आहे. भाजप पुढील ४८ तासांत मुख्यमंत्रिपदासंदर्भात घोषणा करेल. त्यामुळे शिवसेनेकडे आता फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवून आपली बाजू भक्कम करण्याचा, भाजपवर दबाव वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिल्यास चित्र बदलू शकलं असतं, असा विश्वास सेनेतील वरिष्ठ नेत्यांना वाटतो. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधत जुळवाजुळव सुरु केली आहे. शिवसेनेनं पाठिंबा मागितलेला असला, तरीही राष्ट्रवादीनं अद्याप तरी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवान आणि लक्षवेधी घडामोडी सुरु असल्याचं दिसत आहे.