D Y Chandrachud: ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एका मुलाखतीत चंद्रचूड यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
एका मुलाखतीत धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळात सुनवण्यात आलेले अशा महत्त्वाच्या याचिकांची यादी सांगितली ज्याची वाट संपूर्ण देश पाहत होता. आपल्या कार्यकाळात ९ सदस्यीय खंडपीठ आणि सात सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. यावर पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले- एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी. मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधासभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षिक कामगिरी करता आली नाही. या पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी पराभवाचे खापर माजी सरन्यायाधीशांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश चंद्रचूड यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय न घेतल्याने कायद्याची भीती संपली आणि पक्षबदलणाऱ्यांचा फायदा झाला. जर त्यांनी योग्य वेळी निर्णय दिला असता तर या निवडणुकीचा निर्णय वेगळा लागला असता. संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले की- इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुमचे नाव काळ्या शाईने लिहले जाईल.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपत्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर शिंदे गटाने देखील याचिका दाखल केली होती. कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. ज्यावर शिंदे गट हा मुळ शिवसेना असल्याचा निर्णय देण्यात आला होता. यावर शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयात त्यावर निर्णय होऊ शकला नाही.दुसरीकडे शिंदे सरकारचा कार्यकाळ देखील संपला.
चंद्रचूड म्हणाले, गेल्या २० वर्षापासून सर्वोच्च न्यायालायत अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. अशातून सरन्यायाधीश जुनी प्रकरणे सुनावणीला घेतात. संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, मुळ अडचण ही आहे की जर तुम्ही एका राजकीय पक्षाच्या अजेंड्याची काळजी घेता तेव्हा तुम्हाला निरपेक्ष मानले जाते. माझ्या कार्यकळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला. तो काही कमी महत्त्वाचा होता का? आम्ही अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा निर्णय दिला. व्यक्तींच्या अपंगत्वाच्या अधिकारांबाबत विचार केला. कलम ६ ए च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे सर्व मुद्दे कमी महत्त्वाचे होते का? चंद्रचूड यांनी हे देखील सांगितले की- त्यांच्या कार्यकाळात घटनापीठाने ३८ प्रकरणांवर निर्णय दिले आणि ते सर्व महत्त्वाचे होते.