Nashik News: महायुतीत नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाकडे असल्यामुळे ‘आमचाच पालकमंत्री होईल,’ असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
‘सर्वाधिक आमदार आमचे असल्याने पालकमंत्री आमचाच होईल,’ असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केला जात आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याने तीन दिवसानंतरही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याचे उत्तर मिळत नसताना नाशिकमधील महायुतीतील घटकपक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडून एकाला संधी मिळाल्यास जिल्ह्याला तीन मंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यात मावळते पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन पालकमंत्रिपदासाठी प्रयत्न करीत आहेत. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ या पंचवार्षिकमध्ये येत असल्याने हजारो कोटींची विकासकामे शहरात होणार आहेत. त्यानिमित्ताने नाशिकचे नाव जागतिक पातळीवर चर्चिले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडून आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच पालकमंत्रिपदावरून दावा केला जात आहे पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडेच राहील, असा दावा माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला. तर, दुसरीकडे ‘आमचे जास्त आमदार असल्याने आणि सिंहस्थ असल्याने पालकमंत्रिपद भाजपलाच मिळावे,’ अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटानेही उडी घेतली आहे. ‘जिल्ह्यात जास्त आमदार राष्ट्रवादीचे असल्याने आम्हालाच पालकमंत्रिपद मिळेल,’ असा दावा रंजन ठाकरे यांनी केला.
आमदारांचा मुंबईत तळ
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे भाजपमध्ये यंदा डॉ. आहेर यांच्यासह सीमा हिरे, देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत भुजबळ मंत्रिपदासाठी दावेदार असले तरी, अॅड. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे यांच्यापाठोपाठ सुहास कांदे यांच्याकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबई आणि दिल्लीत तळ ठोकून आहेत.