Child Kidnapping Case Bhiwandi : बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे.
भिवंडीतील रामनगर परिसरात पीडित कुटुंब राहते. या साडेतीन वर्षांच्या बालकाचे वडील सूतगिरणीमध्ये काम करतात. हा बालक १७ नोव्हेंबरला सकाळी एकटाच खेळण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने वडिलांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एकजण या बालकाला घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी संशयित म्हणून मोहम्मद युनूस अमीनुद्दीन शाह (५३) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या – गुन्ह्याचा उलगडा झाला. मुंबईतील साकीनाका येथे राहणारा पीर मोहम्मद रफिक अहमद शाह (३९) याला मूल नव्हते. त्यामुळे युनूस याने शेजारी राहणाऱ्या या साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करूत या मुलाला आईवडील नसल्याचे खोटे सांगून ६० हजार रुपयांमध्ये त्याची पीर मोहम्मद रफीक याला विक्री केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. युनूस याला सुरुवातीला दहा हजार रुपये मिळाले होते. उर्वरित पैसे नंतर मिळणार होते, ही बाब चौकशीत उघड झाली.
मुलाचा ताबा पालकांकडे अपहृत बालक पीर मोहम्मद रफिक याच्या घरी होता. त्याच्याबरोबरच समसुद्दीन मुख्तार शाह (४५) याच्यासह तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. तिन्ही आरोपींना अटक करत दोन दिवसांत या गुन्ह्याची उकल करण्यात आली. मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.