Eknath Shinde Press Conference : मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो शिवसेनेसाठी अंतिम असेल. आम्हाला तो निर्णय मान्य असेल, अशा शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेंडू भाजपच्या कोर्टात ढकलला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेताना मनात कोणताही किंतु बाळगू नका, असं मी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. ‘काल माझा पंतप्रधानांशी संवाद झाला. सत्ता स्थापन करताना शिवसेनेचं पूर्ण सहकार्य असेल. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो निर्णय घेईल त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला पाठिंबा असेल,’ असं शिंदेंनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल शिंदे भरभरुन बोलले. ‘आमच्या सरकारनं घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. कोणत्याही सरकारनं इतके निर्णय घेतले नाहीत. आम्ही सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यात राज्याला एक नंबरला आणलं. मविआच्या काळात महाराष्ट्र मागे गेला होता. आम्ही केलेल्या कामांमुळेच आमच्यावर मतांचा वर्षाव झाला. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ अशी माझी प्रतिमा तयार झाली. ती ओळख मला सगळ्या पदांपेक्षा जास्त मोठी वाटते,’ असं शिंदे म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांशी न बोललेल्या एकनाथ शिंदेंनी आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. काल ते एका शासकीय कार्यक्रमात उपस्थित होते. पण त्यावेळी ते माध्यमांशी बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी नाराजी दिसली. शासकीय कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे पाहणंदेखील शिंदेंनी टाळलं होतं. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या, फडणवीसांसोबत त्यांचा दुरावा वाढल्याच्या चर्चांनी जोर धरला.
गेले दोन दिवस शिंदेंनी मौन बाळगलं. या कालावधीत त्यांनी गाठीभेटी टाळल्या. ते शिवसेनेच्या आमदारांनीदेखील भेटले नाहीत. मुंबईत थांबू नका. आपापल्या मतदारसंघात साजरा करा. तुम्हाला निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार माना. लोकांना जाऊन भेटा, अशा सूचना शिंदेंनी त्यांच्या सगळ्या आमदारांना दिल्या. त्यानंतर आज शिंदेंनी त्यांच्या ठाण्यातील शुभदिप बंगल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बंगल्यावर शिवसेनेचे अनेक आमदार, माजी मंत्री हजर होते.