Pune News: पुण्यातील कमाल तापमानात घट झाली असून बुधवारी सकाळी शहरातील तापमान ९.९ अंश सेल्सिअर नोंदवण्यात आले होते. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट आल्यामुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे सलग तिसऱ्या दिवशी पुण्याच्या कमाल तापमानात घट झाली. हिवाळ्याच्या या हंगामातील शहरातील नीचांकी ९.९ अंश सेल्सिअस तापमान बुधवारी सकाळी नोंदविण्यात आले. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे मात्र पुणेकरांना सध्या हुडहुडी भरली आहे.
हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे गेल्या चार दिवसांपासून मध्यमहाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट झाली आहे. दोन दिवसांपासून पुण्यात कमाल तापमानाचा पाराही घसरला आहे. त्यामुळे पुणेकर सध्या पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसभर गारव्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवत आहेत. तर अनेकांना गारवा आणि हवा प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. हिवाळा सगळ्यांचा आवडता ऋतू असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, जॅकेट शॉल, मफलर, घालून फिरण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यापर्यंत किमान तापमान १५ अंशाच्या जवळपास होते, त्यामुळे सकाळी गारवा होता. पण दिवसा हवेत गारवा नव्हता, कमाल तापमान ३० अंशापुढे रेंगाळले होते. दोन दिवस दुपारीही गारवा जाणवतो आहे. संध्याकाळनंतर गार वाऱ्यांमुळे गारठा वाढतो आहे. पुढील दोन दिवस पुणे, नाशिक, अहिल्यानगर भागात थंडीची लाट कायम राहणार आहे, आकाश दिवसभर निरभ्र आणि सकाळी काही भागात धुके असेल. शुक्रवारनंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणचे तापमान
ठिकाण – कमाल – किमान (अंश सेल्सिअसमध्ये)
एनडीए परिसर २८.१ – ८.९
हवेली २७.१ – ९.१
शिवाजीनगर २८.४ – ९.९
पाषाण २७ – १०.२
लवळे २८.९ – १६.२
कोरेगाव पार्क ३०.७ – १४.७