Eknath Shinde calls Narendra Modi : ‘भाजपचे पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल,’ असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मात्र यानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
‘भाजपचे पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल,’ असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मात्र यानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
‘माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेन. सरकार स्थापन करताना माझ्यामुळे कुठली अडचण आहे, असे मनात आणू नका, हे मी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना फोन करून सांगितले. तुम्ही आम्हाला अडीच वर्षे या राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय जसा भाजपसाठी अंतिम असतो, तसा तो आमच्यासाठीही अंतिम असेल,’ असेही भाजप पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मी नाराज नाही
राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही. महाराष्ट्रहित माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मी नाराज नाही. महायुतीतील मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याला माझा पाठिंबा असेल. विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या अडीच वर्षांत महायुतीने केलेल्या कामांवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे,’ असेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, दीपक केसरकर आदी नेते उपस्थित होते.