Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा काही थांबत नाहीयेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांन उत्तर दिलं आहे. या सर्व चर्चांना लवकरच उत्तर मिळेल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री कोण होणार याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील वरिष्ठांची चर्चा सुरू असल्याचे नमूद केले. आधी मुख्यमंत्री ठरेल त्यानंतर मंत्रीमंडळाबाबत मुख्यमंत्री ठरवतील आणि मंत्रिपदाची नावं आपल्या समोर येतील, असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
ईव्हीएमला विरोधी पक्षाकडून होत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमबाबत होत असलेल्या चर्चेबाबत उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, तुम्ही हरले तर ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहेत.’ ‘ईव्हीएमची पद्धत सुरूच राहणार आहे असं कोर्टने नमूद केले आहे. विरोधी पक्षांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळाव लढणार का, असे विचारले असता त्यांनी अधिक भाष्य न करता ‘नंतर ठरवू,’ असे नमूद केले.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अजित पवारांचे संकेत
‘अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. निवडणुकीनंतर आता कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले. त्यांचे संख्याबळ काय, याचा विचार केला जाईल. कार्यकर्त्यांचे म्हणणे काही असले तरी, संख्याबळ गृहित धरले जाईल,’ असे म्हणून ‘भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल,’ असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिले. सरकार स्थापन करताना एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असे समीकरण असेल. ‘उद्याच्या दिल्ली येथील चर्चेनंतर सरकारला अंतिम स्वरूप येईल,’ असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी पवार यांनी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल एकतर्फी दिला आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे. फडणवीस, शिंदे आणि मी दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर पुढील चर्चा होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.’ मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘तेरा, साडेतेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा हा निर्णय उद्या बैठकीत होईल. अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल.’ पवार म्हणाले, ‘पराभव झाला तर ईव्हीएमला विरोधक दोष देत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीची खराब कामगिरी होती परंतु, आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिला नाही.’