Vijay Shivtare on Ajit Pawar : मुख्यमंत्रिपद नशिबात असायला हवं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांवरील प्रश्नावर शिवतारे यांनी दिली.

विजय शिवतारे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, जे निर्णय वरिष्ठ घेतील, त्यानुसार वागणे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. राहता राहिला अजित पवारांचा विषय, तर प्रत्येक पक्षाच्या आमदार आणि नेत्यांना वाटत असतं, की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा, पण ते (कपाळाकडे बोट दाखवत) इथे असायला हवं, असं म्हणत मुख्यमंत्रिपद नशिबी असायला हवं, असं शिवतारेंनी अप्रत्यक्षपणे सुचवलं. टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
विजय शिवतारे यांनी बंड पुकारत बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. येथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात रिंगणात उतरल्या होत्या. परंतु शिवतारेंच्या बंडामुळे महायुतीत फूट पडून बारामतीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.
पुरंदरचा ‘तह’ अन् बारामतीतील बंड
महायुतीची मतं विजय शिवतारेंकडे वळून पत्नीला धोका निर्माण होण्याची शक्यता अजित दादांनी हेरली. त्यातच २०१९ विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्याची पार्श्वभूमीही होती. त्यामुळे शिवतारेंची हरतऱ्हेने समजूत घालत त्यांचं बंड शमवण्यात अखेर महायुतीच्या नेत्यांना यश आलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून पुरंदर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.