New Government In Maharashtra: राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेवरून वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान नवे सरकार येत्या २ डिसेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हलचाली झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असे सांगितले होते. आता मुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो याची उत्सुकता लागली आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असेल तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या २ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.
राज्यातील नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत आज बैठक होत आहे. सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय असेल तर गृहखाते हे देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचे कळते.आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल हे देखील या बैठकीत निश्चित होणार असल्याचे समजते. यात शिंदे यांच्या गटाला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांना बळ मिळू शकते. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतली असली तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळात अधिक जागा शिंदेंना मिळू शकतात.