Chatrapati Sambhajinagar News : आपल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी करत एका कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलं आहे. या पत्राची सध्या एकच चर्चा आहे.
स्वतःच्या नेत्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही, असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महिला आमदार अनुराधा चव्हाण या निवडून आल्या. तर पैठण मतदारसंघातून खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे देखील निवडून आले. या दोन नवनिर्वाचित आमदारांसाठी कार्यकर्ते जय किशन कांबळे यांनी स्वतःच्या रक्ताने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये जय किशन कांबळे यांनी विलास भुमरे आणि अनुराधा चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करा, अशी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले हे पत्र चर्चेत आलं आहे.
दरम्यान, पैठण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विलास भुमरे हे निवडून आले तर राजस्थान अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज सरकार यांना चादर चढवण्याचं साकडे जय किशन कांबळे यांनी घातलं होतं. विलास भुमरे हे निवडून आल्यामुळे जयकिशन कांबळे यांनी अजमेर येथे जात मोठी चादर चढवली. आता उच्चशिक्षित उमेदवार मतदारसंघाला मिळाल्यामुळे विलास भुमरे आणि महिला आमदार म्हणून अनुराधा चव्हाण यांना मंत्रिपद मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करा, कार्यकर्त्याची स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याला आणि उमेदवारांचीही आपल्याला मंत्रिपद मिळावं ही इच्छा आहे. प्रत्येक उमेदवार मंत्रीपदासाठी लॉबिंग करत आहे. कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची जरी इच्छा असली तरी प्रत्यक्षात कोणाला मंत्रिपद मिळतं याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे.