Maharashtra New CM News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची लवकरच घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मोठ्या घोषणेची शक्यता आहे.
अमित शाहांच्या घरी महाबैठक
गुरुवारी रात्री सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार अमित शाहांच्या भेटीला गेले. गुरुवारी रात्री जवळपास १० वाजून २० मिनिटांपासून महायुतीचे नेते अमित शाहांच्या घरी पोहोचले. महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबतच्या भेटीनंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा होऊ शकते. चले.
एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता हा लाडका भाऊ दिल्लीत आला आहे. माझ्यासाठी लाडका भाऊ हेच सर्वात मोठं पद असल्याचं ते म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा अमित शाहांसोबतचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस स्मित हास्य करताना दिसत आहेत. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात फडणवीस हेच तिसऱ्यांदा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत आहे.
दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ जागांपैकी २३० जागा जिंकल्या. भाजपने १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) २० जागा, काँग्रेसने १६ आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने (SP) १० जागा जिंकल्या.