Melghat Tiger Found Dead: अमरावतीच्या मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाड्यांतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील पांढरा खडक वर्तुळात एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या वाघाचे तीन पंजे गायब आहेत.

पांढरा खडक वर्तुळ अंतर्गत वनकर्मचारी गस्तीवर असताना १०३२ वस्तापूर नियत क्षेत्रांतर्गत वाघ मृतावस्थेत आढळला. गस्तीवरील पथकाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. बावनेर, परतवाडा येथील सहाय्यक वनसंरक्षक सुहास चव्हाण आणि मेळघाट प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक अग्रीम सैनी हे सायंकाळी घटनास्थळी पोहोचले.
अंधार पडल्याने घटनास्थळावर पाळत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. दुसऱ्या दिवशी; बुधवारी सकाळी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. सावन देशमुख, स्टँडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे अल्केश ठाकरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर धनगर, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. आर. टाले यांचे शवविच्छेदन पथक गठीत करण्यात आले.
यानंतर उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, सहाय्यक वनसंरक्षक सुहास चव्हाण, अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. बावनेर यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. वाघाच्या मृतदेहाचे काही नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. एकूणच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हा वाघ नेमका कसा दगावला याचे कारण स्पष्ट होईल, असे मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी सांगितले.
शोध समिती गठीत
वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. असे असले तरी मृत वाघाचे तीन पंजे कुऱ्हाडीने कापून नेण्यात आल्याचे समोर आले आहेत. एका पंजाला केवळ दोन नखे आढळली आहेत. वाघाचे पंजे कापून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आली. या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्राइम सेल व पोलिसांच्या समन्वयाने तपास केला जाईल, असेही सैनी यांनी स्पष्ट केले.