Maharashtra Politics : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. या पार्श्वभूमीवर पाहुयात गेल्या २५ वर्षात राज ठाकरे यांचं ‘राज’कारण कसं फिरलं
द कझिन्स ठाकरे या पुस्तकातील संदर्भानुसार २७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरेंच्या घराबाहेर समर्थकांची रीघ लागली होती. ‘मी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. माझं भांडण विठ्ठलाशी नाही, तर बडव्यांशी आहे. ज्यांना राजकारणाचा अबकही समजत नाही, त्यांच्यामुळे मी शिवसेनेचा राजीनामा देत आहे’ असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
मनसेची स्थापना
राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. १८ वर्षांच्या काळात राज ठाकरेंनी स्वतः एकही निवडणूक लढवली नाही. मात्र यंदाची विधानसभा त्यांच्यासाठी खास होती. कारण यावेळी त्यांचा लेक अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला. होमग्राऊण्ड माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभवाचा फटका बसला, मात्र ‘राज’पुत्राने संसदीय राजकारणात उतरणं हा ठाकरे कुटुंबासाठी ऐतिहासिक होता.
२१ व्या वर्षी समर्थ धुरा
१९८९ मध्ये राज ठाकरे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शिवसेनेची विद्यार्थी सेना भारतीय विद्यार्थी परिषद याचं अध्यक्षपद भूषवलं. सहा वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य दौरे केले. २५ व्या वर्षी राज ठाकरेंची संघटनेवरील पकड पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारही अचंबित झाले होते. दैनिक भास्करने यासंदर्भातील किस्सा सांगितला आहे.
१९९५ मध्ये महाराष्ट्रात तख्तपालट झाले. काँग्रेस सरकार गेले आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. मनोहर जोशी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार असतील, असा कयास अनेक जण लावत होते.
बाळासाहेब ढासळले
दरम्यानच्या काळात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे अकस्मात निधन झाले. पुढे त्यांचे सुपुत्र बिंदूमाधव ठाकरे यांचाही अपघाती मृत्यू झाला. बाळासाहेबांना या धक्क्यातून सावरण्यास वेळ गेला. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही होऊ लागला. पुढे रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आलं आणि फासे फिरले.
प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यांनी राज ठाकरेंना क्लीन चिट दिली. मात्र विस्कटलेल्या नात्यांची घडी पुन्हा बसलीच नाही. बाळासाहेबांनी त्यांचा मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवला. २००२ मध्ये उद्धव पहिल्यांदा राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले. पुढे मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारीही उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आली. त्यांनी राज ठाकरेंच्या अनेक निकटवर्तीयांची तिकिटं कापली. शिवसेना-भाजप युतीने १३३ जागा जिंकल्या आणि उद्धव यांचं नेतृत्व सिद्ध झालं. राज ठाकरे नाराज झाले, पण उघडपणे ते दाखवत नव्हते.
उद्धव ठाकरेंकडे धुरा
२००३ मध्ये महाबळेश्वरला शिवसेनेचं ऐतिहासिक अधिवेशन भरलं. उद्धवना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिली. मग माझं आणि माझ्या समर्थकांचं काय? असा प्रतिप्रश्न राज ठाकरेंनी काकाला विचारल्याचं बोललं जातं. ‘तू नाव जाहीर कर, पुढचं मी बघतो’
२००४ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना राज ठाकरेंनाही सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. पुढे तर उद्धव यांनी राज यांना बाळासाहेबांना भेटू देण्यासही नकार दिला. २००५ या वर्षात राज ठाकरेंना कुठली जबाबदारीही दिली गेली नव्हती. उद्धव ठाकरेंचं पक्षातील वजन वाढू लागलं. प्रत्येक निर्णयावर त्यांची छाप दिसू लागली.
Raj Thackeray : बंद दाराआड बैठक आणि राज ठाकरे हमसून हमसून रडू लागले; काय घडलेलं त्या दिवशी?
हमसून हमसून रडले
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे भावनिकदृष्ट्या ढासळले होते. बंद दाराआड झालेल्या बैठकीत राज ठाकरे अक्षरशः हमसून हमसून रडले. राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र संजय राऊत यांनी लिहिल्याचंही बोललं जातं. बाळासाहेब ते वाचूनच समजून चुकले होते.
पुढे, १० डिसेंबर २००५ रोजी ‘सामना’तून बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला. शिवसेना दोन भागात विखुरली जाईल का? या प्रश्नांवर विचार करणं बंद करा. शिवसेना अजय आणि अविनाशी आहे.