Maharashtra Politics: महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळून आता आठवडा झाला आहे. पण तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. खाते वाटपावरुन महायुतीत बरीच रस्सीखेच सुरु आहे.
सध्याच्या घडीला महायुतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचं पानीपत झालं होतं. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना एक अहवाल पाठवला. मंत्रिमंडळात फेरबदल करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशा सूचना करण्यात आल्या. पण लोकसभेतील दारुण पराभवामुळे मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात आला नाही.
केंद्रीय नेतृत्त्वानं पाठवलेल्या अहवालात काही वरिष्ठ नेत्यांची नावं आहेत. नव्या मंत्रिमंडळात त्यातील बहुतांश चेहरे असणार नाहीत. त्यांच्या जागी नवे चेहरे दिसतील. सगळ्याच पक्षांसाठी हा नियम असणार आहे. काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल आणि त्यांना पक्षासाठी काम करण्यास सांगण्यात येईल.
अधिकाधिक मंत्रिपदं देताना भाजप ५० वर्षे वयाचा निकष लावणार आहे. पन्नाशी न ओलांडलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात प्राधान्यानं संधी देण्यात येईल. तरुण मतदारांमध्ये चांगला संदेश जावा, भविष्यातील नेतृत्त्व तयार व्हावं यासाठी भाजप नव्या चेहऱ्यांसाठी अधिक आग्रही आहे. भाजप नेतृत्त्वानं पाठवलेल्या अहवालानं वरिष्ठ मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. मंत्रिपद जाण्याची भीती अनेकांना वाटू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेते मंडळींची अक्षरश: रिघ लागली आहे. नवनिर्वाचित आमदार फडणवीसांची भेट घेत आहेत. भाजप नेतृत्त्व मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे फिल्डींग लावत असल्याचं चित्र दिसत आहे. नव्या मंत्रिमंडळात अधिकाधिक तरुणांना संधी मिळण्याची शक्यता वाढल्यानं ज्येष्ठांची धडधड वाढली आहे.