मी एकट्याने निवडणूक लढवली, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा स्वपक्षीय केंद्रीय मंत्र्यावर मोठा आरोप

Sanjay Gaikwad Allegations on Prataprao Jadhav: शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांनीही स्वपक्षीय खासदारावर घणाघाती आरोप केले आहेत. ‘आपण एकट्यानेच ही निवडणूक लढवली आहे.’ असे म्हणत प्रतापराव जाधवांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बुलढाणा : महाराष्ट्राच्या निकालातून चकीत करणारे आकडे समोर आले आहेत. यातच अनेक पराभूत उमेदवारांसोबतच विजयी उमेदवारांकडूनही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांनीही स्वपक्षीय खासदारावर घणाघाती आरोप केले आहेत. ‘आपण एकट्यानेच ही निवडणूक लढवली, यात मित्रपक्षानेही मदत केलेली नाही. एवढेच काय तर आपल्या पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि आमदारांनीही आपल्या विरोधी उमेदवाराला मदत केली आहे.’ असे गायकवाड म्हणाले. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.

बुलढाणा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवेसेनेच्या उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड यांना एकूण ९१ हजार ६६० मते मिळाली आहेत. त्यांना केवळ ८४१ एवढ्या मताधिक्क्याने निसटता विजय झाला आहे. ही बाब त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांची सपाटून हार झाल्याने अनेकांकडून अंतर्गत कलहांवर बोट ठेवले जात असताना आता महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. विजय खेचून आणण्यासाठी आपल्याला अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागले असल्याची खंत संजय गायकवाडांनी बोलून दाखवली आहे. ते बुलढाण्यात आयोजित त्यांच्या छोटेखानी सत्कार समारोहात बोलत होते.
सायंकाळी उशिरा झालेल्या मतदानामुळे मतटक्का वाढला, मग पुरावे द्या; नानांचा निवडणूक आयोगावर मास्टरस्ट्रोक
कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड म्हणाले, ‘या निवडणुकीत मी एकटाच लढलो आहे, माझ्यासोबत कुणीही नव्हतं. इतकंच काय तर मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही मला मदत केलेली नाही.’ तर ‘जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मदत करणे तर सोडाच पण त्यांनी माझ्या विरोधात उमेदवाराचे तिकीट फायनल केले होते, असा आरोप त्यांनी केला.

यंदा शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी बुलढाणा मतदारसंघात गायकवाडांना कडवी झुंज दिली. यामुळे आपण एक लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा दावा करणाऱ्या संजय गायकवाडांना यंदा हजारपेक्षा कमी मताधिक्क्यावर समाधान मानावे लागले आहे. परिणामी जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आता समोर आली आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

buldhana assemblymaharashtra assembly resultMP Prataprao Jadhavsanjay gaikwadshivsena mla in Maharashtraप्रतापराव जाधवबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निकालशिवसेना आमदारांचे मताधिक्यसंजय गायकवाडांचा आरोप
Comments (0)
Add Comment