Bandu Bacchav Manikrao Shinde: मालेगाव बाह्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव आणि येवल्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे ‘ईव्हीएम’ तपासणीची मागणी केली आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेता निवडण्याएवढ्याही जागा न मिळाल्याने महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली आहे. ‘ईव्हीएम’मध्ये सेटिंग झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांकडून होत असून, नागरिकही या निकालांबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव, तसेच येवला मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी जिल्हा निवडणूक विभागाकडे प्रत्येकी एका केंद्रावरील ईव्हीएम तपासणीची मागणी केली आहे.
यापूर्वी नाशिक पश्चिम मतदारसंघातील १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या सखोल पडताळणीची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या निकषानुसार या पडताळणीत केवळ मॉकपोल होऊन त्यामध्ये संबंधित यंत्रावर पडलेली मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या उमेदवारांना पडताळून पाहता येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मतमोजणीपश्चात विहित कार्यपद्धतीनुसार केवळ ‘ईव्हीएम’च्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलरची तपासणी होणार असल्याने बडगुजर यांनी त्यासाठीचे शुल्क न भरणे पसंत केले.
भरले प्रत्येकी ४७ हजार शुल्क
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील माजी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात अपक्ष लढणारे बच्छाव, तसेच येवला मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात लढणारे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शिंदे यांनी ईव्हीएम तपासणीची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार या मतदारसंघांतील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना निर्धारित शुल्क भरण्यास सांगितले होते. त्यानुसार ४० हजार रुपये आणि १८ टक्के ‘जीएसटी’नुसार प्रतिकेंद्र ४७ हजार २०० रुपये शुल्क दोन्ही उमेदवारांनी भरले आहे. त्याची पावती प्रशासनाला सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४५ दिवसांनंतर बीईएल कंपनीचे अभियंता जिल्ह्यात येऊन उमेदवारांसमक्ष ‘मॉकपोल’ घेणार आहेत.