पती गेल्यावर बाळाला सांभाळलं, नोकरीवर जाताना काळाचा घाला, ३२ वर्षीय माऊलीचा करुण अंत

Gondia Shivshahi Bus Accident : शिवशाही बस उलटल्यानंतर जखमी मदतीसाठी धावा करीत होते. त्यांचा आक्रोश ऐकून या मार्गावरून जाणारा गोंदियाचा जाबिर शेख हा युवक थांबला.

महाराष्ट्र टाइम्स

गोंदिया : गोंदिया-कोहमारा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाला गेल्या सुमारे तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पण, वन व वन्यजीव कायद्यात काम अडकल्याने रस्त्याचे रुंदीकरण थांबले. परिणामी गोंदिया-मुंडीपारपर्यंत या मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी पुढे कोहमारापर्यंत मार्ग अरुंद आहे. या मार्गावर सतत अपघात होतात. मुंडीपार-कोहमारा मार्गाचे त्वरित रुंदीकरण होण्याची गरज आहे. डव्वाजवळील पूल अरुंद आणि कमी उंचीचा आहे. या पुलावरही अनेकदा अपघात होऊन जीव गेले आहेत. या पुलाची उंची वाढविण्याचीही मागणी आहे. शिवशाही बस अपघातानंतर अरुंद रस्ता आणि पुलाचा हा प्रश्न नव्याने चर्चेला आला आहे.

भंडारा-गोंदिया ही लाखनी, साकोली मार्गे जाणारी शिवशाही बस खजरी-डव्वा गावाजवळ दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटली. या बस अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृताचे कुटुंबीय आणि जखमींना मदतीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरून शोकसंवेदना व्यक्त केल्या. जखमींना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी तातडीने द्या, आवश्यकता भासल्यास नागपूरला पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी शासकीय महाविद्यालयात पोहचून जखमींची विचारपूस केली. सोबतच अपघातातील मृतांच्या नातेवाइकांबद्दल माहिती घेतली. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी बस अपघाताील मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख तर जखमींच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. आमदार राजकुमार बडोले यांनीही मदतकार्याच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना केल्या.

Gondia Accident : पती गेल्यावर बाळाला सांभाळलं, नोकरीवर जाताना काळाचा घाला, ३२ वर्षीय माऊलीचा करुण अंत

जिगरबाज जाबिर

शिवशाही बस उलटल्यानंतर जखमी मदतीसाठी धावा करीत होते. त्यांचा आक्रोश ऐकून या मार्गावरून जाणारा गोंदियाचा जाबिर शेख हा युवक थांबला. बसमधील परिस्थिती पाहून कुणीही आतमध्ये जायची हिंमत करीत नव्हते. पण, आतमधील प्रवाशांच्या मदतीसाठी धावा ऐकून जाबिर गहिवरला. खिडकीचे काच फोडून त्याने आत प्रवेश केला. सुमारे १५-१६ महिला आणि पुरुषांना लोकांच्या मदतीने बाहेर काढले. रुग्णवाहिका आणि जेसीबी पाठविण्याची विनंती केली. त्याच्या मदतीची चर्चा होत आहे.
Nanded Crime : लॉजचा तिसरा मजला, पोलिसांची छापेमारी, ६ महिला आणि १२ पुरुष, नसत्या अवस्थेत रंगेहाथ सापडले

स्मिताचाही मृत्यू

पतीचे आजारपणाने निधन झाले. पदरी छोटेशे बाळ आणि सासू-सासऱ्यांची जाबबदारी आली. अनुकंपा तत्त्वातून तिला नोकरी लागली. शुक्रवारी सकाळी ती शिवशाही बसने नोकरीवर निघाली. पण, या बसला अपघात झाला. पतीनंतर तिचाही मृत्यू झाला. बाळ, सासू-सासरे उघड्यावर आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील रहिवासी असलेली स्मिता विक्की सूर्यवंशी (३२) हिची ही कहानी. यासोबतच भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील पिपरी पुनर्वसन येथील राजेश आणि मंगला लांजेवार या दाम्पत्याचाही या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा दोन वर्षांचा सियांशू हा मुलगा गंभीर जखमी आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

accident news today in marathigondia newsGondia Shivshahi Bus AccidentSmita Suryavanshiअरुंद रस्ता ओव्हरटेक अपघातअर्जुनी मोरगाव बस अपघातआई बाबा मृत्यू बाळ पोरकेगोंदिया अपघातशिवशाही बस उलटून अपघात
Comments (0)
Add Comment