Jalgaon Farmer Suicide: जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यात नैराश्यातून शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शासकीय आकडेवारीतून हे वास्तव समोर आले आहे.
हायलाइट्स:
- फेब्रुवारी व एप्रिलमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद
- दर महिन्यात किमान दहा शेतकऱ्यांनी गमावला जीव
- १३७ प्रस्तावांपैकी ६७ शेतकरी कुटुबीयांच्या प्रस्तावांना मान्यता
- ४१ प्रस्ताव सबळ पुराव्यांअभावी अपात्र २९ प्रस्ताव अद्याप निर्णयसाठी प्रलंबित
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यात कपाशी, ज्वारी, बाजरी या जिरायती वाणांसह केळी आणि थोड्या फार प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. रब्बी हंगामात हरबरा, गहू, ज्वारीसह सूर्यफूलाचीही लागवड केली जाते. मागील काही काळापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, तर अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतो. यासह तीन वर्षांपासून कापूस व सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. यामुळेच कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून बहुतांश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत.
कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन
झुरखेडा (ता. धरणगाव) येथील शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी समोर आली. दीपक शिवाजी चौधरी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नापिकी आणि कर्जामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. दीपक चौधरी यांनी खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दहा महिन्यांतील आकडेवारी
जानेवारी – १२
फेब्रुवारी – १८
मार्च – १४
एप्रिल – १८
मे – १४
जून – १२
जुलै – १४
ऑगस्ट – १०
सप्टेंबर – १२
ऑक्टोबर – १३