Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
शरद कोळींची पुन्हा काँग्रेसवर सडकून टीका
सोलापुरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद कोळी व इतर शिवसैनिकांनी खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेचा निषेध केला होता. पुन्हा एकदा शरद कोळी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काही महत्वाची माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये उद्धव सेना स्वबळावर लढणार आहे. त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार आहोत. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत धोका दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे शरद कोळी म्हणाले.
राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. निकाल लागून आठवडा सरत आला तरी मुख्यमंत्रीपदावरचा सस्पेन्स कायम आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळींनी देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान होणार असे म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्रीपदावर भाजपश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.