Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते साताऱ्यात त्याच्या गावी पोहोचले होते. आता ते पुन्हा मुंबईत येत असून मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


एकनाथ शिंदेंचे डॉक्टर काय म्हणाले?
शनिवारी संध्याकाळी एकनाथ शिंदेंच्या डॉक्टरांनी मीडियाशी चर्चा केली. शिंदेंच्या तब्येतीवर बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना ताप आहे. त्यांच्या शरीरात वेदना आणि घशात संसर्ग आहे. त्यांना औषधं देण्यात आली आहेत. दोन दिवसांत ते बरे होतील. ते रविवारी मुंबईकडे रवाना होतील असंही त्यांनी सांगितलं होतं.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ दरे गावी रवाना झाले होते. त्याआधी मुंबईत महायुतीची बैठक होणार होती, मात्र ते हजर राहिले नाहीत. या दरम्यान, राज्याचे नवे सरकार स्थापन करण्यासाठी ज्या पद्धतीने चर्चा आणि अनेक घटना सुरू आहेत, त्यावर ते खूश नसल्याचं बोललं जात आहे.
आता अचानक एकनाथ शिंदे बरे होऊन साताऱ्यातून पुन्हा मुंबईत येत असल्याच्या वृत्ताने राज्यातील राजकारणात एकच चर्चा होत आहे. संध्याकाळपर्यंत काही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात असून महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाबाबतचं चित्रही स्पष्ट होऊ शकतं, असं बोललं जात आहे.
५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी
५ डिसेंबर रोजी राज्यात नवं सरकार स्थापन होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र भाजप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं बोललं जात आहे.