Eknath Shinde helps Handicap man : वाटेतच बसलेल्या दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने एकनाथ शिंदे यांच्या गाडीकडे धाव घेतली. शिंदे यांनी गाडी थांबून त्याची दखलही घेतली. यावेळी आईने आपल्या मुलाच्या दिव्यंगत्वाबद्दल सांगितले.
Eknath Shinde : साहेब माझं लेकरु… दिव्यांग तरुणाच्या माऊलीची आर्त हाक, शिंदेंनी ताफा थांबवला, नंतर जे घडलं…
रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत शिंदेंच्या परतीच्या प्रवासाची लगबग सुरु होती. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसमवेत आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या गावच्या जुन्या घरी आणि सासुरवाडीच्या मंडळींना भेटून आले. गेले तीन दिवस एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांनाही त्यांनी वेळ दिला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
दिव्यांग तरुण आईसह भेटीला
एकनाथ शिंदे हे आजारी असल्याचे सर्वांनाच माहिती झाल्याने जिल्हावासियांसह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि पीडित लोकही त्यांना भेटण्यासाठी आले होते. या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईला निघाले. त्यांचा ताफा हेलिपॅडवर येत असताना वाटेतच बसलेल्या दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने शिंदे यांच्या गाडीकडे धाव घेतली. शिंदे यांनी गाडी थांबून त्याची दखलही घेतली. यावेळी आईने आपल्या मुलाच्या दिव्यंगत्वाबद्दल सांगितले.
आईने व्यथा मांडली
मुलगा दिव्यांग असल्यामुळे घरावर आर्थिक संकट ओढावल्याचे ती माऊली सांगत होती. शासनामार्फत काही मदत व्हावी ही भाबडी आशा घेऊन ही मायलेक तासभर एकनाथ शिंदे यांची प्रतीक्षा करत बसले होते.
मदतीच्या आशेसह मायलेक परतले
ही मायलेक खंडाळा तालुक्यातील कवठे येथील असल्याचे समजते. ते एका मारुती व्हॅनमधून एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी दरे येथे आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी आले होते. शिंदेंनी ताफा थांबवून या दोघांचं ऐकून घेतल्याने मायलेकाचा चेहराही समाधानाने फुलून गेला होता. यथाअवकाश एकनाथ शिंदे मदत करतील, आशा घेऊन हे मायलेक पुन्हा आपल्या गावाकडे परतले. त्यानंतर एकनाथ शिंदेही हॅलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.