तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
अवयदानामुळे मिळाले आठ रुग्णांना नवजीवन
पिंपरी – नुकत्याच ३३ वर्षीय पुरुषाला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारां दरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. व रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटूंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णाची पत्नी, वडील, पाच बहिणी यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे आठ जणांना नवजीवन मिळाले . विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन नेत्रपटल, दोन मूत्रपिंड, हृदय, फुप्फुस, छोटे आतडे हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले यामध्ये दोन मूत्रपिंड, यकृत, दोन नेत्रपटल डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांमध्ये हृदय आणि फुप्फुस हे मुंबई तर छोटे आतडे पुणे येथील रुग्णालयात या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.
“आज आमचा करता धरता आधारवड हरपला आहे, मात्र जीवनाच्याअंती गरजवंत आठ व्यक्तींना नव जीवन दिले हे फार महान कार्य आज घडले” या भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या ते पुढे म्हणाले “त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड होती, सामाजिक कार्यात निस्वार्थ भाव व सामाजिक बांधिलकी त्यांनी कायमच जपली. आज ही त्याचे जीवन इतरांसाठी वरदान ठरले”. अवयवदान करणाऱ्या ३३ वर्षीय रुग्णाच्या पाश्चत पत्नी, दोन मुले, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.
डॉ. डी. वाय पाटील रुग्णायालयात करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी डॉ. तुषार दिघे मूत्रपिंड तज्ञ्, डॉ. बिपीन विभुते यकृत विकार तञ्, डॉ. दीपक रानडे मज्जसंस्था शल्यचिकित्सक, डॉ. स्मिता जोशी भूलतज्ज्ञविभाग प्रमुख यांचा सहभाग होता. डॉ. जे एस भवाळकर अधिष्ठाता, डॉ. एच एच चव्हाण वैद्यकीय अधीक्षक यांचे या प्रक्रियेत योगदान लाभले. यकृत प्रत्यारोपणात ५१ वर्षीय पुरुष तर दोन मूत्रपिंड प्रत्यारोपणात २८ वर्षीय तरुण व ६० वर्षीय रुग्णाचा समावेश होता. नेत्रपटल प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रत्यारोपित करण्यात येईल.
“कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उप कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी आभार मानले. नातेवाईकांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. अवयवदान हे एक पुण्यकर्म आहे. याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे आज दिसून येत आहे.”.असे मत डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले.
या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो अशी भावना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली त्यांनी अवयवदात्याच्या नातेवाईकांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले “अवयवदान व प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे”.