Solapur Tractor Accident: सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी ता. धडगाव जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध कुडुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हायलाइट्स:
- ट्रॅक्टर विहिरीत उलटला, मुकादमाचा हलगर्जीपणा
- तीन ऊसतोड कामगारांच्या चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत
- सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथे भीषण अपघात
कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी ता. धडगाव जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम खिमजी जालम्या तडवी याच्याविरुद्ध कुडुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या एका शेतात जाताना सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून घेऊन जाताना ट्रॅक्टर विहिरीत उलटला.
सुखलाल वसावी हे शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगार म्हणून राहण्यास होते. दुसऱ्या शेतामध्ये ऊसतोडणी करण्यासाठी (एमएच ४५ एएल ४७५३) या ट्रॅक्टरला गाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी वसावी त्यांची पत्नी सायकू वसावी, मुलगी रिंकू, उसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नीतेश शिवा वसावी, परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. ट्रॅक्टर मुकादम खिमजी स्वतः चालवत होता. नागनाथ शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील सदर शेतामध्ये विहीर असल्याचे माहिती असतानासुद्धा अविचाराने, हयगयीने धोकादायकरित्या ट्रॅक्टर चालवल्यामुळे सदर ट्रॅक्टर विहिरीतील पाण्यात पडला.
पोहता येणारे बाहेर निघाले, पण…
ट्रॅक्टर विहिरीत पडल्यानंतर पोहता येणारे पुरुष पाण्याबाहेर आले. महिलांनाही पाण्यातून बाहेर काढले. तीन चिमुकले मात्र विहिरीत बुडाले. घटना समजताच ग्रामस्थांनी मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या सहायाने ट्रॅक्टर बाहेर काढला. सायंकाळी उशिरापर्यंत तिन्ही चिमुकल्याचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.