Kolhapur News: दिग्दर्शक संजय दैव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि कोल्हापूरात तयार झालेला देशकरी या लघुपटाला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. मुंबईत झालेल्या ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात हा कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुला रोवला गेलाय.
नुकत्याच मुंबई येथे चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा आणि सर्वोच्च पुरस्कार मानला जाणाऱ्या ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात यंदा सामाजिक विषयासाठी कोल्हापुरात तयार झालेल्या देशकरी या लघुपट पटाने विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यंदाच्या पार पडलेल्या ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये कोल्हापुरातील दहा पैकी दोन लघुपट शर्यतीत होते यामध्ये कोल्हापूरच्याच स्वप्नील पाटील यांचा मधुबाला हा लघुपटही या स्पर्धेत होते. मात्र प्रसिध्द दिग्दर्शक संजय दैव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देशकरी’ लघुपट ‘जय जवान जय किसान” या संकल्पनेवर तयार करण्यात आला असून एका गरीब शेतकऱ्याच्या घरात असलेल्या शेतकरी मुलगा आणि सैनिक यांना पाहून एका लहान मुलाच्या नजरेतून सैनिक आणि शेतकऱ्यांप्रतीच्या भावनांचा दाखवण्यात लघुपटातून करण्यात आला आहे.
या लघुपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माते संजय दैव असून वैभव कुलकर्णी यांनी पटकथा लिहिली आहे. तर विक्रम पाटील यांचे छायांकन ऐश्वर्य मालगावे यांचे संगीत आहे. यात मारुती माळी, श्रध्दा पवार, अनिकेत लाड, अमृता खांडेकर, प्रमोद कुलकर्णी, साधना माळी, आसावरी नागवेकर, ऐश्वर्य मालगावे, सुरेश पाटील, शिवाजी वडिंगेकर, राजू कुलकर्णी, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बुटके, डी. के. पाटील यांच्यासह बालकलाकारांच्या भूमिका आहेत.
विशेष म्हणजे या संपूर्ण लघुपटाचे चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे झाले आहे बहुतांश स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञान यामध्ये आहेत. यापूर्वी या लघुपटाने ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून आणखीन १५ ठिकाणी नामांकन मिळालेले आहे.