Shivsainik Wrote letter with blood to amit shah: एकीकडे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला आयोजित असून मुख्यमंत्री कोण होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असताना परभणीच्या सेलू येथील शिवसैनिकाने थेट गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.
पवन घुमरे असे या शिवसैनिकाने नाव असून तो शिवसेनेचा सेलू तालुकाअध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, तेच महाराष्ट्र योग्यरित्या सांभाळू शकतात. मागील अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्या कार्यकाळातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, तर बेरोजगार तरुणांसाठीची योजना ही चांगलीच लोकप्रिय झाली आहे. लोकाभिमुख योजनांमुळेच पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड असे बहुमत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा अशी मागणी या शिवसैनिकांनी केली आहे.
दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असून त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात येत आहे. पण अद्यापही मुख्यमंत्री कोण आणि मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, हे मात्र स्पष्ट झाले नाही. अशा परिस्थितीत या शिवसैनिकाने आपल्या स्वतःच्या रक्ताने थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चांगलीच खळबळ उडवली आहे.