Balya Mama Mhatre meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे
शपथविधीच्या तोंडावर भेट
राज्यात सत्तास्थापनेचे वारे जोरात वाहत असून शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अनेक नेते आपल्याला मंत्रिपद मिळावे किंवा सरकारची कृपा राहावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेत आहेत. त्यातच सोमवारी दुपारी राजकारणातील ‘जम्पिंग जॅक’ अशी ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनीही फडणवीस यांची भेट घेतली होती. महायुतीतील घटकपक्षांचे आमदार आणि खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत असताना अचानक महाविकास आघाडीचा नेता भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या.
भेटीचं कारण काय?
अखेर, बाळ्यामामा यांनी याविषयी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी वैयक्तिक कारणांसाठी फडणवीस यांची भेट घेतली. त्याला कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता. मला राजकीय किंवा इतर कारणांसाठी भेट घ्यायची असती तर माझ्याच गाडीतून, भर दुपारी मी त्यांची भेट घ्यायला कशाला जाईन, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Balya Mama Mhatre : माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच
कोण आहेत सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे?
बाळ्यामामा म्हात्रे हे पक्षांतरासाठी प्रख्यात मानले जातात. त्यांनी आतापर्यंत एक-दोन नव्हे, तर तब्बल सात वेळा पक्ष बदललेले आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गट असे सतत पक्ष बदलणाऱ्या बाळ्यामामा यांचा हा आठवा पक्ष. बाळ्यामामा राज्यातील पाचही प्रमुख पक्ष फिरुन झालेले आहेत. त्यात शिवसेनेत तर ते तीन वेळा गेलेले आहेत. सध्या खासदारकीसोबत त्यांचा हा आठवा पक्ष कालावधी सुरु आहे.