Maharashtra Weather Updates: पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजा चमकून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस पडल्यास साखर हंगामावर मोठा परिणाम होणार आहे.
मुंबईमध्ये गारठा जाणवू लागलेला असताना फेंगलनंतर पुन्हा एकदा वातावरणाचा ताप मंगळवारी जाणवला. अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच यामुळे आर्द्रतेतही वाढ झाली. कुलाबा येथे ७० टक्क्यांहून अधिक तर सांताक्रूझ येथे ६० टक्क्यांहून अधिक आर्द्रतेची नोंद झाली. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमान चढे आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे ३४.५ आणि कुलाबा येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.२ अंश सेल्सिअस होते. त्या खालोखाल अलिबाग आणि सांताक्रूझ येथे तापमान नोंदले गेले. शनिवारपर्यंत मुंबईत चढे तापमान राहील, अशी शक्यता असून रविवारी किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित घट अपेक्षित आहे.
काही ठिकाणी हवा समाधानकारक
मंगळवारी प्रदूषण पुन्हा आटोक्यात आल्याचे निदर्शनास आले. मुंबईतील हवेच्या प्रदूषणाच्या गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत होता. मुंबईतील अनेक केंद्रांवर मध्यम श्रेणीतील हवा असल्याचे नोंदले गेले. बोरिवली पूर्व, भायखळा, भांडुप पश्चिम, शिवडी, शीव येथे हवा समाधानकारक असल्याचेही समोर आले.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा
कोल्हापूर : पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजा चमकून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जोरदार पाऊस पडल्यास साखर हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. तमिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर परिणाम झाला असून, कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण झाले आहे. मंगळवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्याचा फटका गुऱ्हाळघरे, साखर कारखाने आणि ऊस तोडणीवर होणार आहे.
बुधवारी चार डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी पाच डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि सांगली, सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा आहे. सहा डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापुरात हीच स्थिती असेल.