khandoba navratri :
‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळला जाणारा भंडारा – खोबरं… हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे हे लक्षात येते. अठरा पगड जातीचा आराध्य दैवत असलेल्या खंडोबाचा महिमा कसा आहे हे जाणून घेऊया या लेखात
जसा पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. जेजुरीला भाविक दक्षिणकाशी असं म्हणतात. ‘’देवा तुझी सोन्याची जेजुरी, गडाला नवलाख पायरी’’ असं म्हटलं जातं. हा खंडोबा नक्की कोणाचा अवतार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात देखील खंडोबा पुजला जातो याबद्दल अधिक जाणून घेऊया या लेखात
खंडोबा शंकराचा अवतार
खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान, कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या आणि अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र, चतुर्भुज, कपाळाला भंडारा असं आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगा इतकाच पुरातन आहे.
मल्हारी, खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत
खंडोबा हे नाव कसं आलं यासाठी अनेक मत मतांतरे आहेत. एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा या शस्त्रावरून आले आहे. दुसर्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. याखेरीज मल्हारी, खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मुस्लमी बांधवांमध्येही खंडोबा प्रसिद्ध आहे. मल्लू खान आणि अजमत खान ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. तर येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते. कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
येळकोट, येळकोट जयमल्हार
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात असल्याचा दावा करतात पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मुळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथेत खंडोबाला शिव आणि वैदिक रूद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाचा भक्तीपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटिय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बीदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन आणि इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.
मराठी साहित्यात खंडोबा
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. आपण खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी वापरतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ आणि वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते. महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव “मार-तोंड” यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.
मार्गशीषमध्ये खंडोबाचा उत्सव
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. मल्हारी माहात्म्य या संस्कृत आणि मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले आहे. खंडोबाने मणी आणि मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल पक्षात सहा दिवस लढाई केली आणि सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो.
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
खंडोबा कडक शिस्तीचा मानला जातो. सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्ध काळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जागती ठेवली जाते त्यातूनच जागर-गोंधळ या लोककलेचा उगम झाला असावा असं म्हणतात. सेनापती खंडोबाला म्हणूनच जागरण अतिशय प्रिय आहे. म्हणून खंडोबा ज्यांचे कुलदैवत आहे तिथे आवर्जून गोंधळ-जागरण घातलं जातं. यातूनच स्फुरलेलं गाणं म्हणजे,
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
वाईच्या तू गणराया जागराला या या
पसरणीच्या भैरी देवा जागराला या या
जेजुरीचा खंडोबा
विशेषत: जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन, कुळधर्म कुळाचाराला विशेष महत्त्व आहे. जेजुरी गडावर शंकर आणि पार्वती हे खंडोबा आणि म्हाळसेच्या रूपात असल्याने जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पहिल्या पाच पायऱ्या वराने वधूला उचलून घेणे, देवदर्शन, तळीभंडार, कुळधर्म कुळाचाराप्रमाणे जागरण गोंधळ, लंगर तोडणे हे विधी केले जातात.
लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव असं खंडोबाला म्हटलं जातं. अठरापगड जातीचे लोक खंडोबाला मानतात. खंडोबाचा आशिर्वाद घेण्याासाठी दरवर्षी त्याच्या दरबारी येतात. असा हा विजयी, यशस्वी, खंबीर, निग्रही, आग्रही, प्रखर, तेजोमय आणि लोकदैवत असलेला खंडोबा याचे दर्शन नक्कीच घ्यायला हवं.