Panvel Viral Video : या महिलेने २३ नोव्हेंबर रोजी तिच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास सत्पुरुष आल्याचा तसेच, त्यांच्या घरातील पोथीमधून अंगारा-विभूती निघत असल्याचा दावा केला होता.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेच्या कथित चमत्कारावर आक्षेप घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ही महिला पनवेल भागात राहण्यास आहे. या महिलेने २३ नोव्हेंबर रोजी तिच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास सत्पुरुष आल्याचा तसेच, त्यांच्या घरातील पोथीमधून अंगारा-विभूती निघत असल्याचा दावा केला होता. तसा व्हिडीओही व्हायरल केला होता. तसेच, कथित चमत्काराच्या घटनेचे समर्थन करणारे व महिलेचा चमत्काराचा दावा करणारे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे या महिलेच्या घरी दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती.
समाजात अंधश्रद्धा पसरवणारा कथित चमत्काराचा व्हिडीओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेलमधील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या कार्यकत्यांनी महिलेच्या कथित चमत्काराला आक्षेप घेतला. पनवेल शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.
… तर २१ लाखांचे बक्षीस
या महिलेने हा चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून त्यांना २१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेलचे मनोहर तांडेल यांनी जाहीर केले आहे.