Ajit Pawar: महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले दोन दिवस दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी ते दिल्लीला गेल्याची चर्चा होती. खातेवाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी दिल्ली गाठल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यावर आज पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. मी वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कोणाच्या भेटीसाठी गेलो नव्हतो. अजितदादांना भेट नाकारल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या. पण मी कोणाला भेटायला गेलोच नव्हतो, तर भेट नाकारण्याचा प्रश्न कुठे येतो, असा सवाल अजित पवारांनी विचारला.
दिल्ली दौऱ्यामागच्या कारणांची यादीच अजित पवारांनी वाचून दाखवली. ‘सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्या खासदार आहेत. त्यांना ११ जनपथ बंगला देण्यात आलेला आहे. कोणतंही घर असू द्या, ते माझं स्वत:चं असो वा सरकारी असो, मला ते नीटनेटकं लागतं हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आर्किटेक्टला सोबत घेऊन नियमात बसून काय गोष्टी करता येतात का त्या पाहण्यासाठी दिल्लीला गेलो होतो,’ असं अजित पवार म्हणाले.
‘प्रफुल पटेल आणि माझ्याविरोधात काही कोर्ट केसेस आहेत. त्या वकिलांना मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. दिल्लीतील जबाबदारी नेहमी पटेलच पार पाडायचे. काल पण तारीख होती. ती पुन्हा पुढे ढकलली. आमच्या चिन्हाचा विषयदेखील एकदा संपावा असा प्रयत्न आहे. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालय त्यात सगळ्यांची बाजू ऐकून निर्णय देईल. इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलं नव्हतं. त्यांना भेटणं गरजेचं होतं. जवळच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. अशा तीन कारणांसाठी मी दिल्लीला गेलो होतो,’ असं अजित पवारांनी सांगितलं.
दिल्लीत इथल्यापेक्षा अधिक आराम मिळतो. जरा निवांत वेळ मिळतो. राज्यसभा चालू असल्यामुळे सुनेत्रा पवार तिकडे होत्या. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळे लोकसभेचे खासदार सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल तिकडेच होते. त्यामुळे त्यांचीही भेट झाली. त्यामुळे मी शहांच्या भेटीसाठी गेलो होतो, ते डोक्यातून काढून टाका. शहांसोबत गेल्याच आठवड्यात चर्चा झालेली आहे, असं अजित पवार म्हणाले.