Ajit Pawar: राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. भाजपच्या निरीक्षकांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राजभवन गाठलं.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यावर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. ‘एकनाथ शिंदेंची मी काल भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सरकारमध्ये असावं ही आमची आणि शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे. शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. मुख्यमंत्रिपद तांत्रिक आहे. आम्ही तिघे मिळून सरकार चालवणार आहोत’, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांशी संवाद झाला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी शिंदेंना विचारला. त्यावर आताच देवेंद्रजींना याबद्दल सांगितलंय. मी पण तेच सांगतोय, तुम्ही थोडं थांबा. संध्याकाळपर्यंत थांबा. शपथविधी उद्या आहे. त्याला अजून वेळ आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं.
शिंदे उत्तर देत असताना अजित पवार मध्येच बोलले. ‘संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीचं समजेल. पण मी तर शपथ घेणार आहे. माझं ठरलंय,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला. अजित पवारांचं मिश्किल विधान ऐकून सारेच हास्याची कारंजी उडाली. शेजारी बसलेल्या शिंदे, फडणवीस यांनाही हसू आवरता आलं नाही.
अजित पवारांच्या मिश्किल विधानावर सगळे हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधली आणि टोला लगावला. ‘दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,’ असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा खसखस पिकली. सगळे खो खो हसले. शिंदेंनी टोला लगावल्यावर दादा पुन्हा बोलले. ‘आम्ही (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) दोघांनी सकाळी शपथ घेतली होती. त्यावेळचं राहून गेलं होतं. आता पुढे ५ वर्षे आम्ही राहणार आहोत,’ असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा सगळेच पोट धरुन हसले.