Eknath Shinde participation in New Govt: देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. उद्या मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाबाबतही साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील की नाही याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपद निश्चित होताच शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राजभवनावर पोहचले. राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. महायुतीतील मळभ आता दूर झाल्याचे चित्र दिसत असले तरी एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकनाथ शिंदेंना भेटून मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ राज्यापालांना पत्र दिले आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून मी शपथ घ्यावी अशी विनंती केली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. तसेच यापुढे महायुतीमध्ये एकत्रितपणाने निर्णय घेतले जातील. मी एकनाथ शिंदेंना भेटून शिवसेनेच्या वतीन मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांचीही तशी इच्छा आहे. शिंदेंचाही यावर सकारात्मक प्रतिक्रिया मिळेल अशी खात्री आहे आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राला चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न करु, असेही फडणवीसांनी नमूद केले.
दरम्यान ‘खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होत आहे. मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे संध्याकाळी सांगणार.’ असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.