High Court will Pronoune Verdict of Kalayaninagar Case: पुण्यातील कल्याणीनगर येथे १५ मे १९९७ रोजी रमेश पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य तिघांची हत्या करून घरातून ४६ लाख ९० हजार रुपयांच्या लूटीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी फैसल होणार आहे.
पुणे सत्र न्यायालयाने डिसेंबर-२०२१ मध्ये याप्रकरणी भागवतला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका केली. तर फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तबचे प्रकरण राज्य सरकारने दाखल केले. याविषयीच्या एकत्रित सुनावणीअंती न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने नुकताच आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावेळी भागवतला न्यायालयासमोर हजर ठेवावे, असे निर्देशही खंडपीठाने येरवडा तुरुंग अधीक्षकांना दिले आहेत.
मूळचे कर्नाटक हुबळी येथील रमेश पाटील (५५ वर्षे) हे पत्नी विजया पाटील (४७) आणि त्यांची मुलगी पूजा पाटील (१३) व मुलगा मंजुनाथ पाटील (१०) यांच्यासोबत प्रिन्सटाऊन सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. गीता ही त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करत होती. तिच्या मदतीने भागवत व साहेबराव यांनी पाटील कुटुंबीयांची हत्या करून घरातील ऐवजाची चोरी केली होती. गीता व साहेबराव हे घटनेच्या वेळी अल्पवयीन होते, या कारणाखाली कालांतराने त्यांची उच्च न्यायालयाकडून सुटका झाली. भागवत अटकेत असताना फरार झाला होता. १२ वर्षांनंतर त्याला पुन्हा अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला. सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सुनावणीअंती त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.