‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना – महासंवाद




  • ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन;
  • राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. ६:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही मॅरेथॉन 6 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे 405 कि.मी. अंतर पार करणार आहेत.

मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.

अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवान, माजी अधिकारी, युवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे ‘जाणूया सैन्य दलांना’ व अहिल्यानगर येथे ‘सैन्य दलात महिलांना समान संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

 







Source link

Comments (0)
Add Comment