Scorpio Horoscope 2025 In marathi : ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ चे नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चांगले आहे पण मार्चपर्यंत शनीच्या ढैय्यामुळे तब्येतीत चढ-उतार होणार आहेत. गुरुच्या भ्रमणामुळे अध्यात्मातील आवड वाढेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रगती होणार आहे. व्यवस्थापन कौशल्याचा वापर केल्यामुळे फायदा होईल. मे महिन्यानंतर कौटुंबिक जीवन उत्तम असेल. दरम्यान शनि ढैया तसेच गुरु व राहूमुळे होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांना कोणते उपाय करायला हवेत तसेच वृश्चिक राशीचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Vrishchik Rashifal 2025 In Marathi :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्ष 2025 भाग्योदयाच्या दृष्टीकोनातून उत्तम आहे. यंदा शनिचे संक्रमण तुमच्या राशीपासून चौथ्या नंतर पाचव्या स्थानात होईल. शनीच्या या बदलामुळे एप्रिल महिन्यापासून वृश्चिक राशीचे जातक चौथ्या ढैय्याच्या प्रभावातून मुक्त होणार आहेत. तर यंदा गुरुचे संक्रमण 14 मेपर्यंत वृश्चिक राशीपासून सातव्या घरात होईल, जे तुमच्यासाठी अनुकूल असून जीवनात शुभफल देणारे आहेत. 14 मे ते 18 ऑक्टोबरपर्यंत गुरु तुमच्या राशीपासून अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे, त्यामुळे तुमची अध्यात्मातील आवड अधिक वाढणार आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुरुचे संक्रमण नवव्या स्थानात होईल, जो तुमच्यासाठी शुभलाभ देणारे असेल. 30 मेपासून राहूचे संक्रमण तुमच्या राशीपासून पाचव्या स्थानात नंतर चौथ्या स्थानात होईल जी तुमच्यासाठी अनुकूल दिसत नाही. चला तर, पाहुया वृश्चिक राशीच्या जातकांसाठी करियर, आर्थिक, प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल. तसेच वृश्चिक राशीच्या जातकांना शुभलाभ मिळण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील.
वृश्चिक राशी 2025 आरोग्य
वर्ष 2025 मध्ये आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण या वर्षाच्या प्रारंभात मार्चपर्यंत शनीच्या ढैय्यामुळे तुम्हाला तब्येतीत चढ-उतार पहायला मिळतील. दरम्यान तुम्ही टेन्शन घेवू नका कारण गुरुच्या शुभ प्रभावामुळे स्थिती फार गंभीर होणार नाही. गुरुचे संक्रमण मे महिन्यापासून अष्टम स्थानात होणार आहे त्यामुळे लिव्हर, मधुमेह किंवा पचनासंबंधीचे आजार डोके वर काढतील. तुम्हाला वर्ष 2025 मध्ये डॉक्टरांचा सल्ला आर्वजून घ्यावा लागेल. मे ते ऑक्टोबरदरम्यान अडचणी येतील त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या.
वृश्चिक राशी 2025 करिअर
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 2025 वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत गेल्या वर्षाची तुलनेत अधिक चांगले असेल. यावर्षी करिअरमध्ये भरपूर प्रगती करणार आहात. वृश्चिक राशीचे जे जातक नोकरी बदलाचा विचार करत आहेत त्यांना यश मिळेल. वर्षातील पहिल्या तीन महिन्यात ऑफिसमध्ये जास्त संघर्ष करावा लागेव पण एप्रिलपासून पदोन्नती आणि वेतनवाढीचे योग तयार होत आहेत. राजकारण आणि सामाजिक कार्यांमध्येही यश मिळेल. शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रात तुमची कामगिरी सुधारणार आहे. व्यवसायात तुम्हाला तांत्रिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम आहे त्याचा भरपूर फायदा तुम्हाला वर्ष 2025 मध्ये होणार आहे. तुमचे संशोधन कार्य यावर्षी सुधारणार आहे.
वृश्चिक राशी 2025 आर्थिक भविष्य
वृश्चिक राशीचे जे जातक घर घेण्याचा किंवा घर बांधण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्तम यश मिळेल. मे महिन्यापासून आर्थिक लाभ आणि प्रगतीचे विशेष संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील. दीर्घकालीन गुंतवणुक लाभ देणार आहे. वर्ष 2025 च्या अखेरीस तुम्ही वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी 2025 प्रेम आणि कुटुंबातील संबंध
प्रेम आणि कौंटुंबिक संबंध याबाबतीत स्थिती सामान्य असेल, पण पहिल्या तीन महिन्यात घरच्यांसोबत समजून वागा अन्यथा नातेसंबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मानसिक तणाव वाढेल तसेच खर्च भरपूर होणार आहे. वडिलांकडून वृश्चिक राशीच्या जातकांना लाभ आणि सहकार्य मिळेल. मे महिन्यानंतर कौटुंबिक जीवन उत्तम असणार आहे. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत असणारे तणाव कमी होतील.
वृश्चिक राशी 2025 उपाय
वृश्चिक राशीच्या लोकांवर या वर्षाच्या आरंभात ढैय्याचा प्रभाव पडणार आहे. तसेच गुरु व राहूच्या कारणाने अडचणी येऊ शकतात. म्हणून, वृश्चिक राशीच्या जातकांना वर्ष 2025 मध्ये पुढील उपाय करावे लागतील, ज्यामुळे गुरु, शनी आणि राहू या तिन्ही ग्रहांचा अनुकूल परिणाम तुमच्यावर राहील.
- प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा.
- गुरु आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या तसेच दररोज भगवान विष्णूसमोर दीप प्रज्वलीत करा.
- चंदनाची अगरबत्ती आणि धूप यांचा वापर करा.
- पंचमुखी किंवा सातमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे संकटे कमी होतील.