मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ठाणे,दि.30 (जिमाका):  1977 ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनविण्यात आली त्यावेळी ती भारतातली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन मार्केट कमिट्या निर्माण झाल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्याची जागा आता कमी पडत आहे, मात्र ही बाजार समिती कार्यान्वित राहणार असून काळाच्या गरजेनुसार आणखी बाजार समित्या कार्यान्वित केल्या जातील. ही बाजार समिती भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट बाजार समिती असेल हेच आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र कायम नंबर वन राहिला आहे.

राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथे आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सचिव डॉ.पांडूरंग खंडागळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुनर्विकासाचे काम प्रस्तावित आहे. याचे नियोजन करताना पुढील 50 वर्षांचे नियोजन करावे. हे काम टप्प्याटप्प्याने वेगाने पूर्ण केले जाईल. पुढील 45 दिवसात या कृषी उत्पन्न बाजार समिती विषयीच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय घेण्यात येतील. राज्य व केंद्र शासनाची मदत घेवून आशियातील सर्वात मोठी मार्केट कमिटी आहे, या लौकिकाला साजेसे काम करूया. जगातील इतर आघाडीच्या मार्केट कमिट्यांचा अभ्यास करावा. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांकडे बैठकीसाठी वेळ मागितला जाईल व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रलंबित विषयांबाबत सविस्तर चर्चा व उपाययोजनांसंबंधीचे नियोजन करण्यात येईल. येत्या काळात सद्य:स्थितीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्यत्यारीतील बाजारपेठांचे विभागनिहाय कृषी मेळावे घेणे प्रस्तावित आहे.

ते पुढे म्हणाले की, सर्व घटकांना एकत्र घेवून या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास साधला जाईल. शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभागाचा मंत्री या नात्याने या दोन्ही विभागांची सांगड घालून शेतकऱ्यांसाठी काही उपयुक्त निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांसमोर आपल्याला आदर्श काम ठेवावेच लागेल. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारल्या जातील.

या बैठकीनंतर पणन मंत्री श्री.रावल यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर आणि कृषी व पणन मंडळाच्या निर्यात सुविधा प्रकल्पांची पाहणी केली.

बैठकीच्या सुरुवातीस पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.जयकुमार रावल यांच्यासमोर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.पांडूरंग खंडागळे आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी मंदार साळवी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज तसेच प्रस्तावित बाबींची माहिती सादर केली.

माजी मंत्री तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत शिंदे यांनी बैठकीच्या प्रास्ताविकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. या बैठकीच्या निमित्ताने संचालक मंडळातील काही संचालकांनी बाजार समितीचा पुनर्विकास, सध्याची कार्यपद्धती, भविष्यातील सुधारणा, अपेक्षित सोयीसुविधा याविषयी आपली मते मांडली. शेवटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी मंत्री महोदयांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

00000

 

Source link

Comments (0)
Add Comment