मुंबई, दि.०३ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत विद्यार्थी आणि वाचकांसाठी राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे शिखर ग्रंथालय असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने करण्यात आला.
दि. १ रोजी नवीन वर्षाची सुरूवात राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथील भव्य दिव्य वाचन कक्षात तसेच ग्रंथालयाच्या बाहेरील ऐतिहासिक पायऱ्यांवर बसून आपल्या आवडीच्या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली.
या सामुहिक वाचन कार्यक्रमात ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथपाल शालिनी इंगोले, लेखाधिकारी योगेश पिंपळे, ग्रंथालय संचालनालय व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी, आणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संचालक श्री.गाडेकर यांनी ‘मानवी जीवनाच्या विकासात वाचनाचे महत्व’ अधोरेखित करून वाचन संस्कृती वाढविण्यास व बळकट करण्यास नवनवीन संकल्पना मांडल्या. विद्यार्थी, कर्मचारी आणि वाचक यांना पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहनही केले.
समूह वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ग्रंथभेट देऊन प्रोत्साहन दिले.
शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविक तर सुजाता माहुलकर यांनी सूत्रसंचालन केले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ