मुंबई दि. 4 : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात. महिला व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणे, त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या “द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहीले आहे.
000