- आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह व्यापण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न
- आदिवासी कल्याणाच्या सर्व उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे पाठीशी
नागपूर,दि. ०५: आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातारवण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवासायीक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे, यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
आदिवासी विकास विभागाच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजातील खेळाडूंनी धनुर्विद्या,ॲथलॅटिक्स आणि देशी खेळांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. आदिवासींमध्ये उपजतच विविध क्रीडा गुण असतात या गुणांना स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता व कौशल्य आधारीत उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम व्यावसायिक खेळाडू येणाऱ्या काळात या समाजातून निर्माण होतील.
राज्याचा आदिवासी विभाग आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, आदिवासी मुलांसाठी राज्य शासनाने नामांकित शाळांची योजना विस्तारीत करून त्यांना चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय करून दिली. स्वयम् योजनेच्या माध्यमातून वसतीगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागू नये यासाठी उत्तम कार्य सुरु आहे. निसर्गाचे रक्षक असणाऱ्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आदिवासी मुल-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे. ही शक्ती अधिक वेगाने निर्माण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच आदिवासींच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याकरिता राजय् शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठिशी उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक विभाग राज्यात प्रथम तर नागपूर उपविजेता, मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान
राज्यातील ठाणे,नाशिक,अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा पार पडल्या. यात ४७५ गुणांसह नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूर विभाग ४५४ गुणांसह दुसऱ्या तर २८१ गुणांसह ठाणे विभागाने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते या तिन्ही संघाना यावेळी बक्षिस वितरीत करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ९७४ मुले आणि ९०० मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेची उर्वरीत बक्षिसे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
तत्पूर्वी, राज्यघटनेची ७५ कलमे मुखोद्गत असणारा शिवांश असराम, झिरो माईल आयकॉन सुप्रिया कुमार यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सुरेश पुजारी, स्वप्निल मसराम आदींचा यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘ब्राइटर माइंड’ उपक्रमांतर्गत डोळयाला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचने,मोबाईलवरील फोटो ओळखने आदिंचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. उर्सुला शाळेच्या विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले. आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.
०००