▪केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान मोलाचे
नागपूर,दि. ०५: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र सरकारमार्फत हाती घेतलेल विविध प्रकल्प व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने घेतलेले विविध प्रकल्प यातून समृद्ध महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत 200 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामे हाती घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यातील विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या ७ उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय क्रीडा मैदान येथे आयोजित या समारंभास वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, वाशिमचे आमदार श्याम खोडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच धुळे येथून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, धामनगाव रेल्वे येथून आमदार प्रताप अडसड, आमदार किशोर जोरगेवार व विविध मान्यवरांनी या सोहळ्यात ई – सहभाग घेतला.
राज्याच्या समतोल विकासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आम्ही सुरवातीपासूनच भर दिला आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतांना मी तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री या जबाबदारीतून महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूल व इतर प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता. राज्यात अत्यावश्यक असलेल्या रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गांची संख्या लक्षात घेता हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी एका कंपणीची नितांत आवश्यकता त्यावेळी भासली होती. वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त सहभागातून महारेल ही स्वतंत्र कंपणी आपण साकारली. एका वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श महारेलने स्थापीत करुन दाखवला. महारेलने त्यांच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरविला असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले. ज्या कामांचे आम्ही भूमिपूजन केले ती सर्व कामे प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत साकार करुन दाखवित आहोत. दळणवळण व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल व भुयारीमार्ग आवश्यक आहेत. महारेल या कंपनीला दिलेली कामे त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. महारेलला यापुढे कामाची कमतरता भासनार नाही. आम्हाला वेग आणि गुणवत्ता याचा सुवर्णमध्य साधणारे अधिकारी व संस्था आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी गुणवत्तेचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी केले.
00000