पुणे, दि. ०५: केंद्र सरकार व राज्य शासन मिळून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यविषयक सेवा तसेच आरोग्य विमा सरंक्षणाकरीता दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याकरीता भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय, मेडिकोज् गिल्ड संघटना, भगिनी मंडळ, बारामती स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांकरीता मोफत कर्करोग निदान शिबिराच्यावेळी ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप, शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक सूरज पाटील, मेडिकोज् गिल्डचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे, सचिव डॉ. चंद्रकांत पिल्ले, भगिनी मंडळाच्या विश्वस्त सुनिता शाह, अध्यक्षा शुभांगी जामदार आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनशैलीत झालेले बदल, व्यसनाधिनता, व्यायाम व सकस आहाराचा अभाव तसेच वातावरणीय बदलामुळे विविध आजार उद्भवत आहेत. समाजात महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोगाचा संपूर्ण समाजावर परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासोबत महिलांची मोफत आरोग्यविषयक तपासणी करण्याच्या उद्देशाने आयोजित अशा शिबिराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. कर्करोगाचे योग्यवेळी निदान करुन उपचार केल्यास हा आजार बरा होतो.
नागरिकांना आपले आरोग्य निरोगी, सदृढ ठेवण्याकरीता मेडिकोज् गिल्ड संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शिबारीचा लाभ होणार आहे. महिलांनी या शिबीरात सहभागी होवून आपली आरोग्यविषयक तपासणी करुन घ्यावी. या शिबीराच्या माध्यमातून महिलांसोबतच त्यांच्या कुटुंबियात आरोग्याच्यादृष्टीने एक नवा विश्वास निर्माण होईल. आपले आरोग्य उत्तम राहिल्यास समाजाची सेवा करता येईल. संघटनेचे आरोग्य क्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे, असे सांगून संघटनेच्या पुढील वाटचालीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
कर्करोग निदान शिबिरात ३९८ महिलांची स्तन आणि गर्भाशय कर्करोगविषयक आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यापैकी १०८ महिलांचे निदानाकरीता नमुने घेण्यात आले.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘रस्ते सुरक्षा’पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
०००