मुंबई, दि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयात आज मुंबईतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुंबईमध्ये सध्या हवेतील कणांचे प्रमाण (PM 2.5 आणि PM 10) या प्रदूषणात वाढ झाली असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हवेतील हे धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याठिकाणी नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी. प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी एक ॲप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना प्रदूषण विषयी तक्रारी करता येतील तसेच संबंधित विभागांना कारवाई करता येईल, अशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
मुंबईत बेकरी आणि रेस्टॉरंटमधील तंदूर भट्टी यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. त्यासाठी या सर्व तंदूर भट्टी इलेक्ट्रिकवर, बेकरी पीएनजी वायुवर चालवण्यासाठी धोरण तयार करावे. तसेच यामध्ये काही अनुदान देण्याचाही अंतर्भाव करावा. प्रदूषण नियंत्रणाचे मासिक वेळापत्रक तयार करावे अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
मुंबईसह महाराष्ट्रात प्रदूषणाच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पर्यावरण विभागाने आरोग्य, एम एम आर डी ए, महानगरपालिका यांचे बरोबर समन्वय साधून या विविध विभागांच्या बैठका घेऊन त्यांना हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सूचना द्याव्यात. जल प्रदूषण, घन कचरा व्यवस्थापन, वैद्यकीय कचरा, ध्वनी प्रदूषण या इतर समस्यांवर निश्चित धोरण तयार करावे अशा सूचना मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिल्या.
सध्याच्या परिस्थितीत नैसर्गिक व हवामान बदलाच्या कारणांमुळेही हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर प्रदूषण पातळी कमी होईल असे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस पर्यावरण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह, बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, परिवहन विभाग, पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/